गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा बावणकर जिल्ह्यात अव्वल

0
88

गोंदिया : जिल्ह्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९६.७९ टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे. गोंदिया येथील गुजराती नॅशनल हायस्कूलची नक्षत्रा होमेश्वर बावनकर हिने ९७.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली. तर शारदा काॅन्व्हेंट हायस्कूलची वेदी बिसेन हिने ९७.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातृून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.या निकालात मुलींनीच बाजी मारली असून, त्यांच्या निकालाची टक्केवारी ९८.४७ टक्के इतकी, तर मुलांची टक्केवारी ९५.७१ इतकी आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा इयत्ता दहावीची परीक्षा आॅफलाइन घेण्यात आली होती. या परीक्षेकरिता नऊ हजार ७१२ मुले, तर नऊ हजार ३३० मुली अशा एकूण १९ हजार ४२ मुला-मुलींनी नोंदणी केली होती. यापैकी नऊ हजार ६४८ मुले, तर नऊ हजार २९४ मुली अशा एकूण १८ हजार ९४२ मुला-मुलींनी परीक्षा दिली. यात नऊ हजार २३५ मुले आणि नऊ हजार १५२ मुली म्हणजेच १८ हजार ३८७ मुले-मुली उत्तीर्ण झाले. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.७१ टक्के इतकी आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९८.४७ टक्के इतकी आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९७.७ टक्के लागला आहे. उल्लेखनीय म्हणजे, यशाची परंपरा कायम ठेवत यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. जिल्ह्यातील बहुतांश विद्यालयांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. गोंदिया येथील शारदा काॅन्व्हेंटची विद्यार्थिनी वेदी भूवनकुमार बिसेन हिला गणीत या विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.
गोंदिया येथील गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचालित मनोहरभाई पटेल सैनिकी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. चिन्मय मेंढे व प्रणय शिंदे या दोन्ही विद्यार्थ्यांनी ९४.६० टक्के गुण घेत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच संस्कार अवसरे याने ९४.२० टक्के गुण घेत द्वितीय, तर अंकित माहुले याने ९४ टक्के गुण घेऊन तृतिय क्रमांक मिळविला आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन, प्राचार्य रूपा मिश्रा, सुभेदार रामगोविंद जगणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

उमरी येथील सम्राट अशोक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. परीक्षेला एकूण ३० विद्यार्थी बसले होते. १२ विद्यार्थी प्रावीण्यश्रेणीत उत्तीर्ण झाले. प्रथमश्रेणीत १३ विद्यार्थी, तर द्वितीय श्रेणीत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव एल. आर. भैसारे यांनी अभिनंदन केले. विद्यालयातून ८५.६० टक्के गुण घेऊन साक्षी रणजीत कापसे प्रथम आली. ८५.४० टक्के गुण घेऊन यज्ञा रवीकुमार येरणे द्वितीय, तर ८४.४० टक्के गुण घेऊन नंदिनी रवींद्र पराते ही तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. मुख्याध्यापक एस. एस. टेंभुर्णे, वर्गशिक्षक एस. व्ही. बडोले, के. एम. भैसारे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.
सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.५२ टक्के लागला. एकूण १४१ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १७ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवून विशेष प्रावीण्यश्रेणी मिळविली. ८९ विद्यार्थी प्रावीण्यश्रेणीत, तर ३६ विद्यार्थी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
निधी शहारे व प्रांजली नंदेश्वर या विद्यार्थिनींनी प्रत्येकी ९५.६० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. काजल बघेल हिने ९४.८० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक, तर चांदणी चांदेवार हिने ९४.४० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष जगदीश लोहिया यांनी काैतुक केले. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय आई-वडील, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, पर्यवेक्षिका कल्पना काळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले आहे.