अवघ्या ६ तासात पोलिसांनी लावला आरोपींचा शोध

0
86

गोंदिया- अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयावर काही काही शिवसैनिकांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. दरम्यान कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणी जलद गतीने तपास कार्य करीत अवघ्या सहा तासात गोंदिया पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शहारुख फिरोज पठाण (२८) रा. बाराखोली व सुमित उर्फ बबल्या गौतम बोरकर (२७) रा. बब्बा भवन श्रीनगर गोंदिया, अमन उर्फ सोनु मुन्ना (२५) रा. सतनामी नगर, रोहित रघुनाथ आकरे (२८) रा. यादव चौक, वसीम जलील शेख (मालाधरी) (२४) रा. शास्त्रीवार्ड व मुकेश उर्फ चिंटू भोलाराम आगडे (३६) रा. कृष्णपुरा वार्ड यांचा समावेश आहे.
राज्याच्या महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षामध्ये झालेल्या बंडाचे वादळ राज्य भरात उमटू लागले आहे. मात्र गोंदियात कसलेही कारण नसतांना अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा कांगावा करीत काही युवकांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. दरम्यान कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍व पानसरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालय परिसरात पोलिसांचा चोखबंदोबस्त लावण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून टिपण्यात आलेल्या आरोपींची सर्वप्रथम ओळख पटविण्यात आली. दरम्यान सर्व आरोपी गोंदिया येथील असल्याचे समोर आले. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे बबन आव्हाड यांना शहर पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपी शोधून काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. पोलिसांनी तपास कायार्ला वेग देत सहाही आरोपींचा पत्ता काढला. दरम्यान दोन आरोपी मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात फरार झाले आहे. तर उर्वरित आरोपी गोंदिया शहरातच असल्याचे समोर आले. यावरून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपींचा शोध घेण्यात आला. मुख्य आरोपी शहारुख फिरोज पठाण (२८) रा. बाराखोली व सुमित उर्फ बबल्या गौतम बोरकर (२७) रा. बब्बा भवन श्रीनगर गोंदिया या दोघांना बालाघाट येथून ताब्यात घेण्यात आले. तर अमन उर्फ सोनु मुन्ना (२५) रा. सतनामी नगर, रोहित रघुनाथ आकरे (२८) रा. यादव चौक, वसीम जलील शेख (मालाधरी) (२४) रा. शास्त्रीवार्ड व मुकेश उर्फ चिंटू भोलाराम आगडे (३६) रा. कृष्णपुरा वार्ड या चौघांना राजस्थान कन्या शाळेसमोरून ताब्यात घेण्यात आले. या चौघांची कसून चौकशी केली असता, आपण शिवसेना कार्यकर्ते असून आमदार विनोद अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात हल्ला करून तोडफोड केल्याची त्यांनी कबुली दिली. अवघ्या सहा तासात गोंदिया पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात यश मिळविले. ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. आव्हाड, शहर पोलिस ठाण्याचे सपोनि. विजय शिंदे, उपपोनि. विघ्ने, उघडे, यादव तसेच पोलिस कर्मचारी कापगते, कावडे, कोडापे, ठाकरे, शेख, गौतम, दिक्षित, दमाहे, सपोनि. पाटील, पोउपनि. सैदाने, उईके, टेंभरे, चौधरी, रहांगडाले, शेंडे, बिसेन, मेर्शाम, चव्हाण, बारेवार, देशमुख, बिसेन यांनी केली.