
मुंबई | गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हवरुन जनतेशी संवाद साधून राजीनाम्याची घोषणा केली. तसेच त्यांनी आपल्या मंत्र्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन राजीनामा पत्र सुपुर्द केला.उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी देखील ट्विटरवर एक पोस्ट लिहित उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे नेहमी आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. तुम्ही खूप छान काम केलंत सर! आणि मला खात्री आहे की, तुम्ही ज्या पद्धतीनं राज्य सांभाळलं, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील, असंही ते म्हणालेत. चाणक्य आज लाडू खात असतील; पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहील.. तुम्हाला आणखी बळ मिळो, असं त्यांनी म्हटलं आहे.





