
गडचिरोली : 9 जुलै – सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. मागील दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातही भामरागड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका येथील नागरिकांना बसल्याचे समोर आले आहे.
येथील कंत्राटदाराने कुमरगुडा रस्त्यावर पावसाळ्यात खोदकाम केले. खोदकामामुळे रस्ता बंद झाला होता. रस्त्यावर खोदकाम केल्याने कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. हा कच्चा रस्ता दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. यामुळे तब्बल 35 गावांचा संपर्क तुटला आहे. ऐन पावसाळ्यात कच्चा रस्ताही वाहून गेल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
भामरागड तालुक्यातील जवळपास 35 गावांच्या वाहतूक या भामरागड-नारायणपूर राष्ट्रीय महामार्गावरून चालते. मात्र, हा कच्चा रस्ता दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. भामरागड-नारायणपूर छत्तीसगढ-महाराष्ट्र मालेगाव महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना प्रवासासाठी मोठी अडचण होत आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात चार महिन्यांत नऊ वेळा भामरागड तालुक्याच्या संपर्क पूर्णपणे जिल्ह्यापासून तुटला होता. प्रत्येक वर्षी सर्वात आधी भामरागड तालुक्यात पावसाळ्यात तालुक्याचा संपर्क तुटत असतो. यावर्षीही तसेच झाले. आता भामरागडच्या तहसीलदार व मुख्याधिकारी हे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून रस्ता सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, नागरिकांना याचा फटका बसला आहे.