
नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 7 वा दिवस आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात घोषणाबाजी केल्याप्रकरणी 19 राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव, डॉ. शंतनू सेन आणि डोला सेन यांच्यासह 19 खासदारांना आठवड्याच्या उर्वरित भागासाठी निलंबित करण्यात आले आहे.
गुजरातमधील विषारी दारु प्यायल्यामुळे 28 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणावर राज्यसभेत चर्चा करण्याची मागणी टीएमसीकडून करण्यात आली होती. पण याबाबत चर्चा करण्यास परवानगी न दिल्यामुळे विरोधकांनी आक्रमकपणे आंदोलन केले. सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे 19 खासदारांवर आठवडाभरासाठी निलंबनाची कारवाई केली. या अधिवेशनात जीएसटी, महागाई या मुद्द्यांवर विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधी पक्ष कामकाजात अडथळा आणत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तर सरकार प्रश्नांवर चर्चा करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

लोकसभेत काँग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन
महागाईचा निषेध करण्यासाठी लोकसभेत फलक दाखविल्याबद्दल सोमवारी काँग्रेसच्या चार खासदारांना संसदेचे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. या खासदारांनी दुपारी हातात फलक घेऊन लोकसभेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता. ज्योतिमणी, मणिकम टागोर, टीएन प्रथापन आणि रम्या हरिदास यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत महागाई, जीएसटीवरून विरोधकांनी गदारोळ केला. प्रमुख मुद्द्यांवर चर्चेपासून सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच विरोधी पक्षनेत्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना कामकाज सुरू ठेवण्याची विनंती केली, परंतु विरोधी सदस्यांनी जीएसटीविरोधात घोषणाबाजी आणि फलकबाजी सुरूच ठेवली. यानंतर संतप्त झालेल्या सभापतींनी खासदारांना निलंबित केले.
फलक दाखवू नका
तुम्ही येथे घोषणाबाजी करण्यासाठी आला आहात की जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आला आहात, असा सवाल सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेत्यांना केला. सभागृह चालले पाहिजे, अशी देशातील जनतेची इच्छा आहे. जर तुम्हाला फलक दाखवायचे असतील तर सभागृहाबाहेर दाखवा. त्यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब केले होते.





