
आठवडी बाजार ठेकेदाराची अव्वाच्या सव्वा वसुली
देवरी नगरंचायतीचे दुर्लक्ष
देवरी,दि.4:- व्यापाऱ्यांना कसल्याही सुविधा न पुरविता आणि दरपत्रक बंधनाच्या चिंधड्या उडवीत देवरीच्या आठवडी बाजारात ठेकेदाराची शेतकरी-विक्रेत्यांकडून मनमानी वसुली सुरू आहे. कंत्राटदाराच्या या मुघलशाहीला विरोध म्हणून देवरी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे मुख्याधिकारी अजय पाटनकर यांना नुकतेच निवेदन दिले आहे. या कंत्राटदारावर निर्बंध कडक करून व्यापारी आणि शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक रोखण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने नगरप्रशासनाला केली आहे.
देवरी बाजारात धान्य, कपडे, सोन्या-चांदीची खरेदी-विक्री होते. ठेकेदाराने विक्रेत्यांकडून किती शुल्क घ्यावे आणि कोणकोणत्या अटी व नियमांचे पालन करावे हे देवरी नरपंचायतीने करारात स्पष्ट केले आहे. तरीही दुप्पट, चौपट वसुली केली जाते. ३० ते ५० रुपयांऐवजी ७० ते १५० रुपये घेऊन त्याच्या पावत्याही दिल्या जात नाहीत. शुल्क वसुलीविषयी बाजारात विविध दर्शनी ठिकाणी स्पष्ट फलक असावेत, असे करारात नमूद केले आहे. त्याचे पालन होत नाही. शुल्क वसूल करणाऱ्यांना गणवेश नसतो. त्यांच्याकडे ओळखपत्र नसते. नगरपंचायतीच्या नियमावलीप्रमाणे बाजाराचा कारभार चालवावा, अशी मागणी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष गोपाल तिवारी, छोटेलाल बिसेन, भैय्यालाल चांदेवार, सचिन भांडारकर, सुजित अग्रवाल, मुकेश खरोले आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
आठवडी बाजार ठेकेदाराने नगरपंचायतीनी ठरवून दिलेले शुल्क वसूल करा, पिण्यासाठी शुद्ध पाणी द्या, शौचालयाची व्यवस्था करा आदी मागणी विक्रेते, शेतकरी करत आहेत. करारात दिलेले नियम ठेकेदाराने पाळावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया
विक्रेत्यांसाठी २० रुपये ते ५० रुपयांपर्यंत दर ठरवून दिला आहे. परंतु त्याचे पालन ठेकेदारांकडून होत नाही. शेतकरी व विक्रेत्याची आर्थिक लूट थांबवण्यासाठी आम्ही निवेदने दिले. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले तर, आता विक्रेते व शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन करू.
गोपाल तिवारी (जिल्हा उपाध्यक्ष राकापा)
ठेकेदार पावती न देता जादा पैसे घेतात. बैठकीसाठी २० ते १५० रुपये घेतात. त्याची पावती दिली जात नाही. तसेच कोणत्याही प्रकारची सुविधा बाजारात नाही. बाजार ठेकेदाराने मनमानी वसुली करू नये, पूर्वीसारखा व्यवसाय राहिलेला नाही. त्यामुळे नगरपंचायतीने ठरवून दिलेली रक्कम घ्यावी. पावती द्यावी.
सी. के. बिसेन (तालुका अध्यक्ष राकापा)





