
मुंबई--औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला आज विधानसभेत मंजुरी देण्यात आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर (SambhajiNagar) तर उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे नाव धाराशिव (dharashiv ) करण्याची मागणी होत होती. विशेष म्हणजे यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुद्धा मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता विधानसभेत सुद्धा नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणातून अनेक घोषणा केली. तर अनेक प्रस्तावांना सुद्धा मंजुरी देण्यात आली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. सोबतच नवी मुंबई विमानतळचं नामांतर दि बा पाटील करण्याच्या प्रस्तावाला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. गेले 5 दिवस वादळी ठरल्यानंतर आज अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके मांडण्यात आली. तब्बल 23 लक्षवेधी सूचना विरोधकांकडून मांडण्यात आल्या आहेत.
- नामांतराचे ठराव मंजूर – विधानसभेत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव नामांतर करण्याचे ठराव मंजूर झाले. यासोबत नवी मुंबई विमानतळाचे नामांतर दि. बा. पाटील विमानतळ करण्याचा ठरावही मंजूर झाला.
- स्वीय सहायकांचे वेतन वाढवले – महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती व उप सभापती आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, प्रत्येक मंत्री व राज्यमंत्री, विधानभंडळाचे सदस्य याणि विधानमंडळातील विरोधीनेते यांच्या स्वीय सहायकाच्या दरमहा वेतनात 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी दरमहा 25, 000 रुपये वेतन असलेल्या स्वीय सहायकांचे वेतन 30, 000 रुपये करण्यात आले आहे. याबाबतचे विधेयक आज विधिमंडळात मंजूर झाले. त्यामुळे सरकारच्या तिजोरीतून दरवर्षी अतिरिक्त 2 कोटी 19 लाख 60 हजार रुपये खर्च होणार आहेत.
- आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरुन खडाजंगी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही आदिवासी भागात कुपोषणाची स्थिती गंभीर असेल तर लाज वाटायला हवी, असे वक्तव्य विधानसभेत आदित्य ठाकरेंनी केले. ‘लाज वाटायला हवी’ या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि आदित्य ठाकरे व शिवसेना आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत हे वक्तव्य मागे घ्यावेत, अशी मागणी केली. त्यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमांचा दाखला देत हे वक्तव्य मागे घेतले.
- खोक्यांवरुन विरोधक आक्रमक – सकाळी शिंदे गट व भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. ’50 खोके, मातोश्री, बारामती ओके’, अशा घोषणा सत्ताधाऱ्यांनी दिला. सत्ताधारी पायऱ्यांवरुन जाताच विरोधकांनी पायऱ्यांची जागा घेतली व पुन्हा सत्ताधाऱ्यांवर खोक्यांवरुनच निशाणा साधला. ‘खाऊन खाऊन 50 खोके, माजलेत मांजर आणि बोके’, अशा झोंबणाऱ्या घोषणा विरोधकांनी दिल्या.
- आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना प्रत्युत्तर – बंडखोरांच्या घोषणाबाजीनंतर आदित्य ठाकरेंनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ठाकरे म्हणाले, शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्या मनात भीती दिसली. गद्दारी या महाराष्ट्राला पटलेली नाही. त्यामुळेच त्यांना पायऱ्यांवर अशी घोषणाबाजी करावी लागत आहे.





