अर्जुनी-मोरगाव : गत दोन वर्षात कोरोना महामारीने विश्वाला हादरवून सोडले. जात-पात धर्म देश यांची खरी किंमत जगाला कळली. आपसातील मतभेद विसरून एकमेकास साहाय्य केले. जगात सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म म्हणजे पोटाचा आणि शेजारधर्म, याची ओळख या काळात झाली. यावर्षी सर्व सण उत्सव उत्साहात साजरे होणार आहेत. पोळा, गणेशोत्सव हे उत्सव जातीय सलोखा ठेवून शांततेत साजरे करा. उत्सवातील खर्च कमी करून गरजूंना मदत करा, अतिवृष्टीने ग्रस्त शेतकरी, शेतमजूर, गरिबांना गणेशोत्सव मंडळांनी मदत करावी. पुढची पिढी घडविण्यासाठी थोर पुरुषांचे चरित्र वाटप करा. उत्सवातून रोजगार निर्मिती होईल याकडे लक्ष द्या. उत्सवात गुलालाच्या जागी फुले उधळा. कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करा. कायद्याचे पालन करून जबाबदारी पूर्ण करा. आतंकवाद्यांना आता मिसईलची गरज नाही, धर्माधर्मात भांडणे लावली की त्यांच्या हेतू साध्य होतो. त्यासाठी आपसात सलोखा ठेऊन शांततेने नांदा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी केले.
ते स्थानिक बाजार समिती सभागृहात शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, तहसीलदार विनोद मेश्राम, ठाणेदार सोमनाथ कदम, उपविभागीय अभियंता लांजेवार, मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव उपस्थित होते.
नगरपंचायतद्वारे विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी जाधव यांनी दिली. सभेला उपविभागीय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना समोर येणारे सर्वच धार्मिक उत्सव अतिशय शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून निर्बंधामुळे कुठलेच उत्सव साजरे झाले नाही. आता कुठे निर्बंध उठविण्यात आली आहेत. अशावेळी उत्सव साजरे करताना शासन व प्रशासनाचे नियम पाळून साजरे करण्याचे आवाहन केले.
तहसीलदार विनोद मेश्राम यांनी, गेल्या तीनचार वर्षात जे काही उत्सव साजरे झाले ते अतिशय शांततेत पार पडले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात शांततेची परंपरा आहे, ती अबाधित ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.या वेळी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी, पत्रकार, पोलीस पाटील, डीजे चालक उपस्थित होते. शांतता सभेचे संचालन पोलीस पाटील जयप्रकाश लाडे यांनी तर उपस्थितांचे आभार ठाणेदार सोमनाथ कदम यांनी मानले.





