मुल्ला येथे सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू

0
29

देवरी,दि.8- तालुक्यातील मुल्ला येथे शेतात काम करीत असलेल्या एका शेतकरी महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना आज गुरूवारी(दि.8) सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली.

मृत महिलेचे नाव तुरसा जयेंद्र कुथीर (वय 40) राहणार मुल्ला असे आहे.

सविस्तर असे की, मृत महिला ही आपल्या कुटुंबियासमवेत शेतात मशागतीचे काम करीत असताना एका विषारी सापाने चावा घेतला. ही बाब पती जयेंद्रच्या लक्षात आल्याने मृत तुरसाला मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केद्रात नेण्यात आले. या आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने तिच्यावर तात्पुरता उपचार करून सुमारे दीड तासाने तिला देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात स्थानांतरित करण्यात आले. वेळेवर योग्य उपचार रुग्णाला मिळाला असता तर तुरसाचा जीव वाचविता येऊ शकला असता, अशी माहिती मुल्लाचे सरपंच कृपासागर गौपाले यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. उल्लेखनीय म्हणजे मुल्ला ग्रामपंचायती मार्फत अनेक वेळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका दुरुस्ती आणि इतर कामासाठी आर्थिक मदत करूनही वेळेवर आमच्या नागरिकाला मदत मिळू शकली नाही, अशी खंत सुद्धा श्री गौपाले यांनी व्यक्त केली.

मृत तुरसाच्या मागे पती, मुलगा आणि मुलगी असून तिचे गरीब शेतकरी कुटुंब आहे. तिच्या अपघाती मृत्यूने कुथीर कुटुंबीयांवर संकट कोसळल्याने गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, कुथीर कुटुंबीयांना शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी समोर आली आहे.