
कोविडच्या 2 वर्षांनंतर राज्यभरात गणेश विसर्जन उत्साहात झालेले असतानाच काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याचे समोर आले आहे.
पनवेलमध्ये विसर्जन करत असतानाच वीजेच्या धक्क्याने 11 भाविक जखमी झाले. वडघर खाडी परिसरात रात्री 8.30 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.वडघर खाडी परिसरात विसर्जन घाटावर भाविक मोठ्या संख्येने एकत्र आलेले असतानाच एका विद्युत खांबाची विजेची तार तुटली. ही तार थेट गणेशभक्तांवर कोसळल्याने त्यांना वीजेचा तीव्र धक्का बसला.
दुर्घटनेनंतर सर्व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी गणेश विसर्जन करताना भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
नांदेडमध्ये तलावात बुडून युवकाचा मृत्यू
नांदेडमध्ये गणेश विसर्जनाला तलावात उतरलेल्या एका युवकांचा मृत्यू झाला आहे. नायगाव तालुक्यातील भोपाळा गावात ही घटना घडली. शिवकुमार हत्तीनगरे (वय 20) असे मृत युवकाचे नाव आहे. तो गणपती विसर्जनासाठी तलावात उतरला असताना गाळात फसल्याने त्याचा मृत्यू झाला.
बालकाला वाचवताना युवकाचा मृत्यू
जळगावमधील जामनेर शहरात गणेश विसर्जनादरम्यान बुडून युवकाचा मृत्यू झाला. कांग नदीपात्रातील बोदवड रोडवरील पुलाखालील बंधाऱ्यात एक मुलगा गणेश विसर्जनादरम्यान पडला. त्याला वाचवताना स्वतः युवकाचाच बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.