
पंचायत समिती सदस्या वंदना प्रकाश पटले यांनी पंसच्या सभेत मागणी
गोंदिया,दि.10ः- गोंदिया पंचायत समितीच्या 8 सप्टेंबरला पार पडलेल्या सर्वसाधारण मासिक सभेत गंगाझरी पंचायत समिती क्षेत्राच्या सदस्या वंदना प्रकाश पटले यांनी ओबीसी समाजाच्या विकासात्मक मुद्यांवर प्रश्न उपस्थित करुन ओबीसी जननगणनेसह इतर विषयांवर लक्ष वेधत ठराव समंत पारित करुन शासनाकडे पाठविण्याची मागणी केली.या सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती मुनेश रहागंडाले होते.यावेळी उपसभापती निरज उपवंशी,गटविकास अधिकारीसह इतर अधिकारी उपस्थित होते.आत्ता पंचायत समितीचे सभापती खरंच ओबीसी हिताचे ठराव शासनाकडे पाठवतात काय याकडे लक्ष लागले आहे.
श्रीमती पटले यांनी सभेतील चर्चेत सहभागी होतांना संपुर्ण भारतातील बहुसंख्य मागासवर्गीय ओबीसी समाजाचा सामाजिक, राजकीय , शैक्षणिक, सर्वांगीण विकास होण्यासाठी मागासवर्गीय ओबीसी समाजाची सामाजिक, शैक्षणिक , आर्थिक स्वरुपाचा वास्तविक डाटा समोर येणे गरजेचे आहे.यासाठी केंद्र शासनाकडून जातनिहाय जनगणना करण्यात यावी व ओबीसी समाजाला न्याय देण्यात यावे.ओबीसी समाजाच्या योजना राबवण्यासाठी महाज्योती संस्थेसह सर्व ओबीसी मंडळाचा ओबीसी समाजात प्रचार-प्रसिद्धी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर महाज्योती सेवक यांची बार्टी संस्थेच्या समतादूत प्रमाणे महाज्योती संस्थेकडून नेमणूक करण्यात यावी.जिल्हास्तरावर महाज्योती कक्ष स्थापित करण्यात यावे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार सारखी योजना लागू करण्यात यावी.जिल्हा परिषद, नगर परिषदा, नगर पंचायती , महानगरपालिका असा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुसंख्य ओबीसी समाजाच्या विकासासाठी ओबीसी बहुजन कल्याण सभापती हे पद शासनाकडून निर्माण करण्यात यावे. ओबीसी समाजासाठी शासनाने स्वतंत्र ओबीसी घरकुल योजना तयार करावी. ओबीसी समाजासाठी असलेली असंवैधानिक क्रिमीलेयरची अट रद्द करण्यात यावी.ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी जिल्हा व तालुका पातळीवर निवासी वसतिगृहांची स्थापना करण्यात यावे यासह अनेक सामाजिक विषयावर चर्चा करीत सदर मुद्द्यावर ठराव पारित करण्याची मागणी केली.