34.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home महाराष्ट्र ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ हा उपक्रम राज्यातील जलचळवळ अधिक गतिमान करेल- मुख्यमंत्री

‘सत्यमेव जयते वॉटर कप’ हा उपक्रम राज्यातील जलचळवळ अधिक गतिमान करेल- मुख्यमंत्री

0
19

blank

मुंबई : चित्रपट अभिनेते आमीर खान यांच्या ‘पानी फाऊंडेशन’मार्फत जलसंधारणविषयक जागरासाठी महाराष्ट्रात सुरु होत असलेला ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ हा उपक्रम राज्यातील जलयुक्त शिवार अभियानाची लोकचळवळ अधिक गतिमान करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बुधवारला (दि.17) विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस, चित्रपट अभिनेते आमीर खान यांच्यासह जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला, बजाज ॲटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज, ‘भारत फोर्ज’चे अमित कल्याणी, चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दिग्दर्शक सत्यजित भटकळ, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शासकीय योजना ह्या लोकांपर्यंत लोकांच्याच भाषेत पोहोचविल्या गेल्या पाहिजेत. या कामी सेलिब्रिटी व्यक्ती निश्चितच महत्वपूर्ण योगदान देऊ शकतात. जलयुक्त शिवार अभियानात लोकांबरोबर कॉर्पोरेट क्षेत्रानेही महत्वपूर्ण सहभाग दिला. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अक्षय कुमार आदी कलाकारांनी राज्यातील दुष्काळाची परिस्थिती बदलण्यासाठी महत्वाचे कार्य आणि मदत केली. आता आमीर खान यांच्या पानी फाऊंडेशनमार्फत सुरु होत असलेला ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ हा उपक्रम राज्यातील जलयुक्त शिवार अभियानाची लोकचळवळ अधिक गतिमान करेल आणि राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने एक महत्वाचा उपक्रम ठरेल.

अभिनेते आमीर खान यांनी यावेळी पानी फाऊंडेशन आणि ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ उपक्रमाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, सध्या प्रायोगिक तत्वावर राज्यातील कोरेगाव (जि. सातारा), वरुड (जि. अमरावती) आणि अंबेजोगाई (जि. बीड) या तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील पाणी प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने या उपक्रमातून प्रयत्न करण्यात येतील.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) मीनल जोगळेकर यांनी केले.

blank