
शरद पवार, यशवंत मनोहर यांची उपस्थिती
गोंदिया-भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन नागपूर येथे दिनांक ८ आक्टोबर रोजी संपन्न होणार असून देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार हे अधिवेशनाला प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी दिली आहे.१९७२ साली स्थापन झालेल्या भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. भटक्या विमुक्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सदर संघटना कार्यरत आहे. आंदोलनाची विविध मार्ग अवलंबून संघटनेने अनेक लढे लढले आणि यशस्वी केले आहे. हजारो एकर जमीन भटक्या विमुक्तांना मिळवून देण्यात या संघटनेचा मोठा वाटा आहे.
नागपुरातील सुरेश भट सभागृहात संपन्न होणाऱ्या या अधिवेशनात गोंदिया जिल्ह्तील परेश दुरूगवार, अनिल मेश्राम, यशवंत दिघोरे, मनिराम मौजे, मनोज मेश्राम, शुभांगी मानकर सह अनेक कार्यकर्ते या अधिवेशनात भाग घेणार आहेत, यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे. विविध ठराव शासनापुढे मांडले जाणार आहेत. भटके विमुक्त ज्या ठिकाणी राहत आहेत त्या जागा आणि कसत असलेल्या गायरान जमीनी शासनाने तात्काळ त्यांच्या नावावर करून द्याव्यात या प्रमुख मागणीसह विविध मागण्या आणि विषय अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थितांसमोर ठेवण्यात येणार आहेत.
सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत यशवंत मनोहर हे या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भुषविणार असून कोल्हापूरचे शाहु महाराज, बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष लक्ष्मण माने हे मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन प्रशांत वंजारे व गोंदिया जिल्ह्तील संघटनेचे कार्यकर्त्यांनी केले आहे.