37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

0
29

blank

मुंबई,दि.10- मराठी सिनेसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी आली आहे. साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. आज फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार त्यांची स्मृतीही कमी झाली होती. यावर काही उपचार नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरीच ठेवण्याचा सल्ला दिला होता. अखेर आज दुपारी १२ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात धाकटा मुलगा, सून, मोठ्या मुलाची पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. काही शस्त्रक्रिया आणि वयोपरत्वे आलेले आजारपण यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर आज (10 डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. याचवर्षी कला क्षेत्रातील अमुल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रसिद्ध मराठी लावणी सम्राज्ञी म्हणून त्यांची ख्याती होती. फड सांभाळ तऱ्याला गं आला.., पाडाला पिकलाय आंबा, मला म्हणत्यात पुण्याची मैना यांसारख्या एकाहून एक ठसकेबाज लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या आवाजात स्वरबद्ध केल्या.

blank

मुंबईतील चाळीत गेले होते बालपण
सुलोचना चव्हाण या माहेरच्या सुलोचना कदम… मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी गायनला सुरुवात केली होती. त्यावेळी मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता “श्रीकृष्ण बाळमेळा”. याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका साकरल्या. त्यांची मोठी बहीण स्वतः कलाक्षेत्रात नव्हती, पण सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या.

blank

वयाच्या नवव्या वर्षी गायले होते पहिले गाणे
श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्यामुळेच संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते “कृष्ण सुदामा”. पहिले गाणे जेव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. नंतर त्यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांत पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत सहगायक असत. मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करियरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले.

वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या “भोजपुरी रामायण” गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले.

blank

ही होती पहिली लावणी
मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी आचार्य अत्रे यांच्या “हीच माझी लक्ष्मी” या चित्रपटात गायली. संगीतकार होते वसंत देसाई, आणि ही लावणी चित्रित झाली होते हंसा वाडकर यांच्यावर. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. त्या लावणीचे शब्द होते “मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी…”. आचार्य अत्रे यांनीच त्यांना “लावणीसम्राज्ञी” असा किताब दिला.

सुलोचना चव्हाण यांना महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे 2009चा राम कदम पुरस्कार, 2011चा महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

  • सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड:वयाच्या नवव्या वर्षी पहिले गाणे रेकॉर्ड, आचार्य अत्रेंनी दिला होता ‘लावणी सम्राज्ञी’चा किताब

महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला

मुंबई, दि. १०: – “मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरात आणि मनामनात पोहचविणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे”,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. श्रीमती चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “ महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा आवाज एक मोठा ठेवा आहे. त्यांना आवाजाचे वरदानच मिळाले होते. या आवाजाची ताकद ओळखून त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि कलासाधनेतून अनेक गाणी अजरामर केली. मराठी लोककलेचं वैशिष्ट्य असणाऱ्या लावणीमध्ये तर त्यांनी श्वासच फुंकला. लावणीची नजाकत त्यांनी आपल्या सुरांनी जिवंत केली. त्यामुळंच तमाशा फडातील ही लावणी घऱाघरात आणि मनामनापर्यंत पोहचली. पार्श्वगायनासह, लावणीचे विविध प्रकार त्यांनी खुलवून सादर करत रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून उमेदीच्या काळात विविध कारणांसाठी निधी उभारणीकरिता जाहीर कार्यक्रम केल्याची उदाहरणे आजही दिली जातात. अशा लोककलेशी आणि समाजाशी एकरूप, सहृदय महान कलावंताचे निधन हे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची हानी आहे. ज्येष्ठ गायिका, लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

दरम्यान, श्रीमती चव्हाण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

blank