
वाशिम, दि. 22 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला,कृषि विभाग व आत्मा, अकोला यांच्या संयुक्तवतीने डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कृषि प्रदर्शनाचे आयोजन २७ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत विद्यापीठ क्रीडांगण, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ,अकोला येथे करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात फळबाग, भाजीपाला, फुलशेती, वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, ऊस, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषि अभियांत्रिकी ईत्यादी विभागाची दालने आणि ईतर सलंग्न संस्थासह, कृषि निविष्ठा व कृषि औजारे यांची दालने सुध्दा राहणार आहे.
२७ ते ३१ डिसेंबर दरम्यान दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत शास्त्रज्ञ – शेतकरी सुसंवाद, प्रगतीशील शेतकऱ्यांचे मनोगत व मान्यवरांच्या संबोधनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनातील कृषिपुरक व्यवसाय दालने तथा कृषि प्रक्रिया उद्योगातील दालने प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. ही दालने या कृषि प्रदर्शनात मुख्य आकर्षण राहणार आहे. याशिवाय गट शेती, करार शेती, स्वयं सहायता बचतगटांच्या यशोगाथा, महिला बचतगटांनी उत्पादित केलेले कृषि आधारीत उत्पादने, शेतकऱ्यांनी तयार केलेली नाविन्यपूर्ण शेती अवजारे इत्यादींची अभिनव दालनेसुध्दा उपलब्ध राहणार आहेत. या प्रदर्शनात ३०० च्या जवळपास दालने उपलब्ध राहणार असून हे कृषि प्रदर्शन राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
तरी जिल्हयातील शेतकऱ्यांनी व कृषि क्षेत्राशी निगडीत व्यक्तींनी या कृषि प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे संचालक, विस्तार शिक्षण डॉ.धनराज उंदिरवाडे यांनी केले आहे.




