साई रिसॉर्ट सदानंद कदम यांच्‍या मालकीचेमाजी आमदार संजय कदमांचा गौप्यस्फोट

0
13

खेड – दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तेच्या जप्तीची कारवाई नुकतीच सक्‍तवसुली संचालनालयाने ( ईडी) केली आहे. मात्र, या रिसॉर्ट प्रकरणी माजी आमदार संजय कदम यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. साई रिसॉर्ट नेमके कोणाचे याचा खुलासा करताना कदम यांनी हे रिसॉर्ट उद्योजक सदानंद कदम यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. सदानंद कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे धाकटे बंधू आहेत, अशी माहिती माजी आमदार कदम यांनी आज (दि.७) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.

संजय कदम म्हणाले, दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेश कदम आणि त्यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम त्यांचे सख्खे बंधू उद्योजक सदानंद कदम यांच्याविरोधात आहेत. अनिल परब यांनी सुरुवातीपासून साई रिसॉर्ट प्रकरणी आपला काहीही संबंध नाही, असे वारंवार स्पष्ट केले आहे; मग साई रिसॉर्ट नेमकं कोणाचं? हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न होता. उद्योजक कदम यांच्या मालकीचे रिसॉर्ट असताना अनिल परब यांच्या विरोधात मुद्दामाहून वातावरण निर्माण करण्यात आले.

सदानंद कदम यांनी आपल्या उद्योगाच्या जोरावर कष्टाने कमावलेल्या पैशातून हे साई रिसॉर्ट दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी बांधले आहे. कोकणातील बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून आणि पर्यटन वाढीसाठी रिसोर्ट बांधले. मात्र, जे आपण व आपला मुलगा करू शकत नाही, ते आपल्या भावाने केले. याची सल रामदास कदम यांना होती. त्यामुळे आपला भाऊ आपल्यापेक्षा मोठा होऊ नये, म्हणून रामदास कदम हा सर्व खटाटोप करत आहेत. त्यामुळे कदम यांची प्रवृत्ती काय आहे, हे सर्वांना समजले आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

️रामदास कदम यांनी आपल्या सख्ख्या भावालाच नाही. तर दापोली विधानसभा मतदारसंघातील समुद्रकिनारी असलेल्या शेकडो रिसॉर्ट चालक मालक आणि कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड मारली आहे. रामदास कदम यांनी दापोली तालुक्यातीलच नव्हे, तर कोकणातील पर्यटन संपवण्यासाठी विडा उचलला असल्याचा आरोप संजय कदम यांनी यावेळी केला.