
राजकोट – भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी२० सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २२८ धावा केल्या. श्रीलंकेला आता विजयासाठी २२९ धावांची गरज आहे. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने ४५ चेंडूत शतक साजरं केलं.
या खेळीत त्याने ६ चौकार आणि ८ षटकार मारले. त्याआधी भारतीय संघाचा सलामीवीर इशान किशन फक्त एका धावेवर बाद झाला. त्याने पहिल्याच षटकात चौथ्या चेंडूवर दिलशान मधुशंकाच्या गोलंदाजीवर धनंजय डि सिल्वाकडे दिला. इशान किशन बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी सहाव्या षटकात बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांनी डावाची सूत्रे हाती घेतली.
सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. तर शुभमन गिलनेसुद्धा फटकेबाजी केली. शुभमन गिल ३६ चेंडूत ४६ धावा काढून बाद झाला. त्याने सूर्यकुमार यादवसोबत १११ धावांची भागिदारी केली. शुभमन गिलनंतर हार्दिक पांड्या आणि दीपक हुड्डा हे दोघेही प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत तुफानी ११२ धावांची खेळी केली. या खेळीत सूर्यकुमार यादवने ७ चौकार अन् ९ षटकारांची आतषबाजी केली.
तर अक्षर पटेलने ९ चेंडूत ४ चौकारांसह २१ धावा केल्या. यामुळे भारताने २० षटकात ५ बाद २२८ धावा केल्या. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अद्याप कोणतीच टी२० मालिका गमावलेली नाही. त्यामुळे पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग तिसऱ्या मालिका विजयासाठी उत्सुक आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे मालिका वाचवण्याचे आव्हानही भारतीय संघासमोर असणार आहे.