
सत्यशोधक समाज संघासह सर्व ओबीसी बहुजन संघटनांची मागणी;राज्यातील विविध जिल्ह्यात दिले निवेदन
गोंदिया, ता. ५ ः क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला (११ एप्रिल) शासकीय सुटी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी गोंदिया जिल्ह्यात ओबीसी संघटना व सत्यशोधक समाज संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसिलदार यांच्यामार्फेत निवेदन देण्यात आले.संभाजीनगर येथे राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर करण्यात आले.११ एप्रिलला शासकीय सुट्टी घोषित करण्यात यावी यासाठी माळी समाज ,ओबीसी अधिकार मंच,ओबीसी संघर्ष समिती,ओबीसी सेवा संघ, शिवसेना उ.बा.ठाकरे, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, बहुजन क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, तालुका पत्रकार संघ, अखिल भारतीय सावता माळी युवक संघ, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा या सर्व संघटनांनी सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांना मानण्यात येते. महात्मा फुले यांनी स्वातंत्र्य, समता, मित्रता व न्याय ही मुल्ये भारतातच नाही तर विश्वात रुजविण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. महात्मा फुले यांनी सत्य प्रस्थापित करण्यासाठी जिवाची बाजी लावली. मराठी भाषेत पहिलं पवाड्यारूपी शिवचरित्र लिहिण्याचा, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची लपविलेली समाधी शोधण्याचा व शिवजयंती सुरू करण्याचा मान तात्यासाहेब महात्मा फुले यांनाच जातो. कारण शिवाजी महाराजांना महात्मा फुले यांनी आदर्श अर्थात गुरू मानले.
समस्त शुद्र-अतिशुद्रांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या महात्मा फुलेंना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरूस्थानी मानून महात्मा फुलेंचे अपूर्ण कार्य भारतीय संविधान लिहून पूर्णत्वास नेले. महात्मा फुलेंचे गुरू शिवाजी महाराज व महात्मा फुले यांना गुरू मानणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शासकीय सुटी मंजूर आहे. परंतु महात्मा फुले यांच्या जयंतीला शासकीय सुटी नाही, हे योग्य नाही. दरम्यान, शासनाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला (११ एप्रिल) शासकीय सुटी जाहीर करावी, तसा आदेश काढावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना ओबीसी संघर्ष समितीचे कैलाश भेलावे,ओबीसी सेवा संघाचे पेमेंद्र चव्हाण,महात्मा फुले समता परिषदेचे राजेश नागरिकर, प्रमोदकुमार बघेले, डी. आय. खोब्रागडे, सुनील भोंगाडे, भंडारी चाैधरी, प्यारेलाल तुरकर, विनोद बन्सोड उपस्थित होते.क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर कराण्यात यावी या मागणीचे निवेदन अ.भा.महात्मा फुले समता परिषद व सत्यशोधक समाज संघटना यांच्या वतीने सटाणा ता.बागलाण जि. नाशिक येथील नायब तहसीलदार श्रदा बागवार यांना देण्यात आले. या प्रसंगी महात्मा फुले समता परिषद तालुकाध्यक्ष वैभव गांगुर्डे, शहराध्यक्ष यशवंत कात्रे, जेष्ठ नेते मुरलीधर आप्पा खैरनार, प्रशांत बागुल, सुदर्शन जाधव ,सागर शेलार, गणेश जाधव, सुभाष बागुल, नामदेव खैरनार, संदिप खैरनार, राजेंद्र जाधव, प्रकाश जाधव, हेमंत खैरनार, राकेश मोरे, अमित गांगुर्डे ,संजय खैरनार ,अंबादास मोरे, शांताराम वाघ, मनोज बागुल, गोरख मोरे ,नितीन बागुल ,भास्कर बच्छाव ,विशाल जाधव व छत्रपती: शाहू: फुले: आंबेडकर प्रेमी उपस्थित होते.

