
खाजगी रुग्णालयांनी बालकास हिपॅटायटीस-बी लसीकरण 24 तासाच्या आत देऊन शासनाच्या लसिकरण
मोहिमेस सहकार्य करावे
गोंदिया,दि.6-नियमित लसीकरण व गोवर रूबेला लसीकरणाची जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.नियमित लसीकरण व गोवर रूबेला लसीकरण मोहिमेचे सादरीकरण जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी सादरीकरण केले.
लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे. सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्यामुळे आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण सत्राचे आयोजन करावे व कुठलाही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याचे या प्रसंगी सांगितले.
डॉ.सुतार यांनी प्रसूती झाल्यानंतर 24 तासाच्या आत बाळाला हिपॅटायटीस- बी लसीकरण देणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य संस्थेमध्ये प्रसुती झाल्यानंतर बाळाला हे लसीकरण देण्याचे प्रमाण योग्य आहे परंतु खाजगी नर्सिंग रुग्णालयात प्रसूती झाल्यावर बालकास वरिल लसीकरण देण्याचे प्रमाण कमी असुन ते वाढविणे गरजेचे असल्याचे समितीला सांगितले. तसेच जिल्ह्यात जरी गोवर संसर्गजन्य साथ नसली तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या द्रुष्टीकोनातुन गोवर– रुबेला लसीकरणापासुन वंचित असलेल्या बालकांसाठी 4 था टप्पा लसीकरण मोहिम 4 एप्रिल ते 10 एप्रिल 2023 दरम्यान लसीकरण मोहिम राबिण्यात येत असल्याचे समितीला सांगितले.
जिल्हास्तरीय समिती सभेला नागपुर विभागाचे गोंदिया जिल्हा नोडल अधिकारी डॉ. गोगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.रोषन राऊत, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण चव्हाण ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.बी. जयस्वाल, आयएमएचे सचिव डॉ. संजय माहुले,उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिल चव्हाण, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे दिनेश लबडे तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी,ग्रामीण रुग़्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.