ओबीसींच्या हक्काच्या लढाईत युवकांनी सहभाग घ्यावा-उमेश कोरराम

0
15

नागपूर -येथे ओबीसी युवा अधिकार मंचतर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.सोबतच ओबीसी युवा अधिकार मंचचे प्रथम वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. मागच्यावर्षी 14 एप्रिल 2022 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ओबीसी युवकांनी मिळून ओबीसी युवा अधिकार मंचची स्थापना केली होती.

ओबीसी युवा अधिकार मंचच्या माध्यमातून वर्षभर अनेक कार्यक्रम व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2022 पर्यँत विदर्भातील 7 जिल्ह्यात मंडल यात्रा काढण्यात आली होती. त्यात प्रामुख्याने ओबीसी जनगणना,ओबीसींचे वसतिगृह, विदेश शिष्यवृत्ती,स्वाधार योजना,इतर मागास आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, मागासवर्ग आयोग,सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, ओबीसींना 100% शिष्यवृत्ती तथा महाज्योती बद्दल माहिती देण्यात आली व अनेक महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन केले गेले. सोबतच अनेकदा विद्यार्थी युवकांच्या हक्कांसाठी मंच नेहमी अग्रेसर राहिला.शासनाने 72 वसतिगृह, स्वाधार योजना आणि विदेश शिष्यवृत्ती योजना काही प्रमाणात मान्य केली आहे आणि बरेच मुद्दे प्रलंबित आहेत अजूनही 72 वसतिगृह व स्वाधार योजना सुरू झालेली नाही.

यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने आणि जोमाने मंडल यात्रा काढण्याचे ओबीसी युवा अधिकार मंचने ठरविले आहे.
यावर्षी ओबीसी जनगणनेचा मुद्दा महत्त्वाचा असेल यासाठी लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे.

आजच्या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती सांगण्यात आली आणि मंडल यात्रा व इतर कार्यक्रमासंबंधी चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश कोरराम होते. या ओबीसींच्या न्याय व हक्काच्या लढाईत युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन उमेश कोरराम यांनी केले.
पियुष आकरे,राहुल वाढई, देंवेंद्र समर्थ,अनुप खडक्कर, पंकज सावरबांधे, नितीन पडोळे,रजत लांजेवार, धिरज भिषिकर,मनीष गिरडकर शैलेश निरंजने कार्यक्रमात उपस्थित होते. राहुल वाढई यांनी आभार प्रदर्शन केले.