
चंद्रपूर : चिचपल्ली- जुनोना मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्मीळ वाघाटीचा पिल्लू ठार झाल्याची घटना रविवारी उजेडात आली. चिचपल्लीवरून हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे दिनेश खाटे व त्यांचे सहकारी शहाबाज शेख जात असताना रस्त्यावर काहीतरी छोटा प्राणी मृतावस्थेत पडून असल्याचे आढळून आले. जवळ जाऊन बघितले असता मृत प्राणी दुर्मिळ वाघाटी मांजराचे पिल्लू असल्याचे निदर्शनास आले.सहसा निदर्शनास न येणारी वाघाटी मांजर ही निशाचर असल्याने दिवसा फार क्वचितच आढळते.
चिचपल्ली- जुनोना-पोंभुर्णा हा रस्ता संपूर्ण जंगल क्षेत्रातून जातो. या भागात वन्यप्राण्यांचा कर्दनकाळ ठरलेली रेल्वे लाइनसुद्धा आहे. या रेल्वे रुळावर एक मोठा पूल बांधण्यात आला. इतर भागात म्हणजेच मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी या क्षेत्रात कुठेही असे पूल बांधण्यात आलेले नाही. सर्व भागात भुयारी मार्ग करण्यात आले आहे. परंतु, चिचपल्ली- जुनोना-पोंभुर्णा रस्त्यावर मोठा पूल बांधण्यात आला. रात्री अवैध तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले. रेती तस्करसुद्धा हाच रस्ता वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण वनविभागाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.