पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) चे ज्येष्ठ नेते प्रकाश सिंग बादल यांचे आज (मंगळवार) मोहालीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते.
प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. प्रकाशसिंग बादल यांचा जन्म ८ डिसेंबर १९२७ रोजी पंजाबमधील अबुल खुराना या छोट्याशा गावात जाट शीख कुटुंबात झाला.
प्रकाश सिंग बादल यांच्या पत्नी सुरिंदर कौर यांचेही निधन झाले आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल हे त्यांचे पुत्र आहेत.
कोविड नंतरच्या आरोग्य तपासणीसाठी त्यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. बादल यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कोरोना विषाणूची लागण देखील झाली होती. त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.





