सावरकरांचा जन्मदिन ‘गौरव दिवस’ म्हणून साजरा करणे हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान; नक्षलवाद्यांच्या पत्रकाने खळबळ

0
25
file photo

गडचिरोली : स्वातंत्र्य संग्रामातून पळ काढत इंग्रजांची पाचवेळा माफी मागणाऱ्या सावरकरांचा जन्मदिन ‘गौरव दिवस’ म्हणून साजरा करणे, हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान असल्याची टीका नक्षल्यांनी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (माओवादी) दंडकारण्य पश्चिम सब झोनल ब्यूरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने हे पत्रक काढले आहे.

नक्षलवाद्यांनी काढलेले हे पत्रक समाज माध्यमावर सार्वत्रिक झाले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मोदी जेव्हापासून सत्तेत आले. तेव्हापासून देशाचे भगवेकरण सुरू आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सुरवातीच्या काळात सावरकर सक्रिय होते. परंतु, इंग्रजांच्या तावडीत सापडल्यानंतर त्यांना अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली. इंग्रजांची माफी मागून स्वतःची सुटका करून घेतली.

 Savarkar birthday

देशातील बुद्धिवाद्यांनी विरोध करावा

देशासोबत गद्दारी करणाऱ्या अशा व्यक्तींचा जन्मदिन एकनाथ शिंदे यांचे सरकार ‘गौरव दिवस’ म्हणून साजरा करणार आहे. हा निर्णय खऱ्या स्वातंत्र्यविरांचा अपमान करणारा आहे. या निर्णयाचा देशातील बुद्धिवाद्यांनी विरोध करावा, असे आवाहन नक्षल्यांनी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

एवढ्यावरच न थांबता हिंदू महासभा सारख्या संघटनेला पुढे करून ‘भारत छोडो’ आंदोलनात इंग्रजांचे समर्थन केले. १९२३ ला लिहिलेल्या ‘हिंदुत्व’ पुस्तकात धर्मावर आधारित देशाची संकल्पना मांडली. हिंदू, मुस्लिम द्वेष वाढविला. एकीकडे भगतसिंग, सुभाषचंद्र बोस सारख्या योद्ध्यांनी इंग्रजांविरोधात बंड पुकारत आपल्या प्राणाची आहुती दिली. तर दुसरीकडे सावरकर यांनी देशात द्वेष पसरवून इंग्रजांना साथ दिली.