
किल्ले रायगडावर आज तारखेनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रायगडावर अडीच लाख शिवभक्त जमले आहेत. छत्रपती संभाजीराजे पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. ढोल ताशांच्या गजरात व शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण किल्ले रायगड दुमदुमून निघाला आहे. जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषांनी शिवभक्तांमध्ये उत्साह संचारलेला आहे. सुमारे अडीच लाख शिवभक्त रायगडावर आल्याने सर्वांनी शिस्तबद्धपणे शिवरायांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आलेले आहे.
नवीन राजवाड्यात सोहळा
कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ऐतिहासिक लाल महालात पवारांच्या हस्ते अभिषेक
पुण्यातील ऐतिहासीक लाल महालात छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपस्थिती होती.
सोहळ्यातील पाहा फोटो…



सर्वांचे दर्शन होईपर्यंत गडावरच थांबणार- छत्रपती संभाजीराजे
दुर्गराज रायगडावर सध्या जवळपास अडीच लाख लोक उपस्थित असून गडाच्या खाली जवळपास 50 -75 हजार लोक आलेले आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये. जिल्हा व पोलीस प्रशासन सोबत बैठक झालेली आहे. सध्या गडावर असलेले लोक9-10 च्या दरम्यान गड उतरतील, तेव्हा शिस्तबद्ध रीतीने खाली असलेल्या लोकांना वरती सोडले जाईल. सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गडउतार होणार नाही, याची शाश्वती मी देतो, असे आश्वासन छत्रपती संभाजी महाराज यांनी दिले.
विशेष टपाल तिकीटाचे होणार अनावरण
शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना म्हणून राज्य सरकार मंगळवारी विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते करणार आहे. राजभवनात सायंकाळी हा कार्यक्रम होईल.
चित्तथरारक प्रात्यक्षिके, पोवाड्यांचे सादरीकरण
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मंगळवारी रायगडावर मोठ्या थाटात साजरा होत आहे. यासाठी हजारो शिवभक्त सोमवारीच गडावर दाखल झाले आहेत. मावळ्यांच्या वेशभूषेतील तरुणांनी विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली. शाहिरांनी पोवाडेही सादर केले.
350 वा शिवराज्यभिषेक सोहळा वर्षाला प्रारंभ
आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. 6 जून 1674 रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. किल्ले रायगडावर न भूतो न भविष्यति असा झालेला ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ पार पडला. ही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली घटना होती. आज 6 जून रोजी तारखेनुसार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यंदा 2 जून रोजी तिथीनुसार आणि 6 जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेकाला 349 वर्षे पूर्ण होऊन 350 वं वर्ष सुरु होत आहे.
सार्वभौम राज्याची स्थापना
‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या शिवराज्याभिषेकामुळे दिसून आलं. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली.
हे ही वाचा
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह : ज्या होनांनी 350 वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेक झाला, त्यानेच आज अभिषेक

हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ज्या सुवर्ण हाेनांनी झाला, ते शिवकालीन सुवर्ण होन आजही साेलापुरात आहेत. याच सुवर्ण होनांनी शिवराज्याभिषेकदिनी अभिषेक होतो. हा सोहळा घरगुती स्वरूपात असला तरी त्याला ऐतिहासिक जतनाचे सुवर्णकोंदन आहे. ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक तथा वस्तू संग्राहक किशोर चंडक यांच्याकडे हे शिवकालीन सुवर्णहोन, फनम आणि विजयनगर साम्राज्यातील नाणी आहेत.





