31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ सर्व यंत्रणाच्या समन्वयाने किंडगीपारला आदर्श ग्राम करणार- कुलगुरु डॉ.शरदचंद्र गडाख

सर्व यंत्रणाच्या समन्वयाने किंडगीपारला आदर्श ग्राम करणार- कुलगुरु डॉ.शरदचंद्र गडाख

0
24

गोंदिया,दि.17 : डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला अंतर्गत विदर्भातील 11 गावांची आदर्श ग्राम म्हणून निवड करण्यात आलेली असून यामध्ये जिल्ह्यातील गोंदिया तालुक्यातील किंडगीपार गावाची निवड झाली आहे. विविध विभागाच्या योजनांच्या व विद्यापिठाच्या विकसीत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने किंडकीपारला एक आदर्श ग्राम म्हणून विकसीत करणार, असे प्रतिपादन डॉ.पंजाबराव कृषि विद्यापीठ अकोलाचे कुलगुरु डॉ.शरदचंद्र गडाख यांनी केले.

         16 जून रोजी गोंदिया तालुक्यातील किंडगीपार येथे कृषि विज्ञान केंद्र गोंदिया यांचेमार्फत खरीप हंगामपुर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, डॉ.धनराज उंदीरवाडे संचालक विस्तार शिक्षण डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला, प्रकल्प संचालक आत्मा अजित अडसुळे, कृषि उपसंचालक सुरेश कन्नाके, डॉ.सय्यद शाकीर अली वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्र हिवरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

        आदर्श ग्राम संकल्पनेची पार्श्वभूमी सांगतांना सर्वप्रथम नोव्हेंबर 2022 मध्ये या गावात कृषि विज्ञान केंद्र हिवरा मार्फत सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये भौगोलिक क्षेत्र, स्त्री व पुरुष लोकसंख्या, प्रमुख पीक, उत्पन्न, उत्पादकता इत्यादिंचा अंतर्भाव करण्यात आला. या सर्वेक्षणाच्या आधारे मिळविलेल्या माहितीचे विश्लेषण करुन या गावामध्ये सभांचे आयोजन, शास्त्रज्ञ भेटीचे आयोजन करण्यात आले व या गावाची आदर्श ग्राम म्हणून विकसीत करण्यासाठी निवड करण्यात आली. सदर गावामध्ये शेतीचे उत्पादकता वाढविण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादन ते मार्केटिंग अशी मुल्यसाखळी विकसीत करणे, एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करुन शेती फायदयाची करणे, फळबाग लागवड, औजारे, बँक संकल्पना राबविणे इत्यादी कामे नियोजित असल्याचे त्यांनी सांगितले.

       अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासन, विविध शासकीय यंत्रणा ही सदैव किंडगीपार ग्रामस्थांच्या पाठीशी उभी राहून गावाला आदर्श ग्राम निर्माण करण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

       डॉ.धनराज उंदीरवाडे यांनी किंडगीपार गावामध्ये येत्या खरीपात धान पिकाच्या लागवडीकरीता श्री पध्दत, पट्टा पध्दत, मेटारायझीमचा वापर कशाप्रकारे फायदेशीर आहे याबाबत माहिती दिली.

       अजित अडसुळे यांनी आत्मा व कृषि विभागामार्फत कोणत्या योजनांचा लाभ किंडगीपार गावाला देता येईल याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

        सुरेश कन्नाके यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याची कार्यपध्दती, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, शासन आपल्या दारी उपक्रम व पीएम किसान योजना ई-केवायसी करुन घेण्याचे महत्व याबाबत सविस्तर माहिती दिली.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सय्यद शाकीर अली वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषि विज्ञान केंद्र हिवरा यांनी केले. कार्यक्रमास नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अविनाश लाड, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, जिल्हा पशुधन अधिकारी कांतीलाल पटले, कृषि अधिकारी पवन मेश्राम, पं.स.सदस्य विद्याकला पटले, किंडगीपारच्या सरपंच लिला उईके, पोलीस पाटील फनिशा सराटे, प्रगतीशील शेतकरी महेंद्र ठाकुर, पुरुष व महिला शेतकरी तसेच किंडगीपार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विषय विशेषज्ञ विजय कोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मृद शास्त्रज्ञ गणेश खेडीकर यांनी मानले.