
* शहर पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागात उपलब्ध आहे पेटी
गोंदिया: शहरातील महिला व मुलींच्या तक्रारींना प्राधान्य देण्यासाठी शहर पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागात गुलाबी पेटी लावण्यात आली असून या पेटीच्या माध्यमातून आता महिलांचे तक्रार निवारण त्वरेने होणार आहे.
महिलांवर व मुलींवर अनेकदा अन्याय व अत्याचार होत असतात. मात्र त्याची वाच्यता किंवा तक्रार कुठे करावी हे माहीत नसते. त्यामुळे त्यांना हमखास तक्रार करता यावी, यासाठी पोलिश अधीक्षक निखिल पिंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागात गुलाबी रंगाची तक्रार पेटी लावण्यात येऊन दिनांक 14 जुलै रोजी ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात रजनी रामटेके यांच्या हस्ते रिबीन कापून पेटीचे उद्घाटन करण्यात आले. समस्याग्रस्त महिला या प्रत्यक्षात येऊन तक्रार करण्यास घाबरतात म्हणून तक्रारीची दखल घेण्यासाठी ही पेटी लावण्यात आली आहे. यावेळी ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी, महिला व बाल समुपदेशक रजनी रामटेके, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी राऊत, संरक्षण अधिकारी रेखा बघेले, समुपदेश मधू बिसेन, लीना बुरडे, पूजा डोंगरे, आरती ठाकरे, मनोरमा पानतावणे व महिला पोलीस कर्मचारी व अंमलदार उपस्थित होते. शहर पोलीस ठाण्याच्या
हद्दीत असणाऱ्या महिला व मुली आपली तक्रार या पेटीत टाकू शकतात.