सैनिकाचा तरुणीवर बलात्कार

0
37

नागपूर : सैन्यातील गार्ड रेजिमेंटल सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या विवाहित सैनिकाने कामठीतील एका २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. ती गर्भवती झाल्यानंतर तिचा बळजबरी गर्भपात केला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून सैनिकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बिरेन अकाण तीमूंग (३२, जी.आर.सी.कॅन्टोन्मेंट, कामठी) असे आरोपी सैनिकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जी.आर.सी.कॅन्टोन्मेंटमध्ये कार्यरत असलेला सैनिक बिरेन तीमूंग हा मूळचा आसाम राज्यातील आहे. तो विवाहित असून त्याचे कुटुंब आसाममध्ये राहते. तर पीडित तरुणी संजना (बदललेले नाव) पदवीचे शिक्षण घेत असून गेल्या दोन वर्षांपूर्वी तिची सैनिक बिरेनशी ओळख झाली होती. ज्या रस्त्याने संजना महाविद्यालयात जायची, त्याच रस्त्याने बिरेन हा तिचा पाठलाग करायचा.काही दिवस पाठलाग केल्यानंतर त्याने संजनाला रस्त्यात अडवून चौकशी केली. तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि तिला मॅसेज पाठवत होता. त्याने तिला भेटायला बोलावले. अविवाहित असल्याचे सांगून तिला प्रेमाची मागणी घातली. तो तिला कामठीतील कर्तव्य बजावत असलेल्या ठिकाणी भेटायला बोलवत होता. दोघांचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्यानंतर त्याने तिला घरी नेले. तिला शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला.

तिने नकार दिला असता बिरेनने तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. त्यामुळे घाबरलेल्या संजनाने त्याच्याशी संबंध तोडले. मात्र, तो तिच्या घरासमोर वर्दीवर येऊन कुटुंबियांना फसविण्याची धमकी द्यायला लागला. त्यामुळे संजनाने त्याला लग्न करण्याची अट घातली. त्याने लग्न करण्यासाठी होकार दिला आणि जंगलात नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली.तिने फोन करून बिरेनला गर्भवती असल्याचे कळविले. त्याने लगेच तिला घरी बोलावले आणि तिच्या पोटावर लाथ मारून गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. गर्भपात केल्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवले. तिने गर्भपात केल्यानंतर त्याने विवाहित असल्याचे सांगून लग्नास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सैनिकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.