भंडारा: पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आणि जिल्ह्यातील इतरही महत्त्वपूर्ण विषयांना घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुनील मेंढे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रामुख्याने पूर परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाची तयारी, मध्यप्रदेश आणि जिल्हा प्रशासनातील समन्वय, शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला निवासी जिल्हाधिकारी श्रीमती फाळके, उपजिल्हाधिकारी मोरे, आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे बोरकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि इतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला खासदारांनी पूर परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे 25 स्वयंचलित बोटी, गृहरक्षक दलाचे जवान आणि समाज कार्य करणाऱ्या 300 हून अधिक कार्यकर्त्यांचा समूह असल्याचे सांगण्यात आले. धरणातील पाण्याची पातळी कायम ठेवण्याच्या प्रयत्नात मागील वर्षी पूर परिस्थिती उद्भवली होती. अशावेळी लोकांचे हित लक्षात घेता प्रसंगानुरूप योग्य निर्णय जलद घ्यावा, तसेच रुक्मिणी नगर खात रोड भंडारा येथे पुराचे पाणी जमा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करण्याचे निर्देश खासदारांनी दिले. यापूर्वी मध्य प्रदेश प्रशासन आणि जिल्हा प्रशासनात समन्वय नसल्याने पूर परिस्थितीचा सामना करावा लागला असा निष्कर्ष पुढे आला होता. त्यामुळे यावेळी हा समन्वय राखला जावा असेही खासदारांनी सांगितले.
नुकत्याच मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा हस्तांतरणाच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांची चर्चा झाली. शासकीय जागा ताबडतोब हस्तांतरित करून घेणे आणि आवश्यक असलेल्या परवानग्या मिळविण्यासाठी ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश खासदारांनी दिले. प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी पुढाकार घेत कारवाई करावी, असेही सांगितले.
धान खरेदीच्या अनुषंगाने आढावा घेताना त्यांनी काही शेतकऱ्यांना धान विक्रीचे त्यांना पैसे मिळाले नाही या विषयाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. काही शेतकऱ्यांनी केंद्रावर धान दिले मात्र केंद्र आणि केंद्र चालकाच्या गैरव्यवहारामुळे शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नाही. यात शेतकऱ्यांची चूक नसल्याने ताबडतोब शेतकऱ्याला मोबदला देण्यात यावे असे सांगून खासदारांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
भूमिगत गटार योजनेसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. या खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अशा रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी असे निर्देशही खासदार सुनील मेंढे यांनी यावेळी दिले. यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, तालुकाध्यक्ष विनोद बांते, जि.प.सदस्य प्रियांक बोरकर, माजी उपाध्यक्ष न.प.भंडारा रुबी चढ्ढा, आशु गोंडाणे, नगरसेवीका आशा उईके, सौ.साधना त्रिवेदी, सौ.वनिता कुथे, सौ.चंद्रकला भोपे, सौ.मधुरा मदनकर, सौ.गिता सिडाम व अन्य उपस्थित होते.