33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News सोमय्या प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसाद, पेनड्राइव्ह विधान परिषदेच्या पटलावर; सरकारने दिली चौकशीची...

सोमय्या प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसाद, पेनड्राइव्ह विधान परिषदेच्या पटलावर; सरकारने दिली चौकशीची ग्वाही

0
24

blank

मुंबई-भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचा पेनड्राईव्ह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी विधान परिषदेच्या पटलावर सादर केला. त्यांनी हा पेनड्राइव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांना सुपूर्द करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी याप्रकरणी कुणालाही पाठीशी न घालता चौकशी करण्याची ग्वाही दिली.

महिला अधिकाऱ्यांना धमकावून पिळवणूक

काही राजकारणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या महाराष्ट्रातील संस्कृतीला छेद देण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध पदांची प्रलोभने दाखवून, ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांची भीती दाखवून महिला अधिकाऱ्यांना धमकावून त्यांची पिळवणूक व शोषण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या प्रक्रणी किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल करताना म्हणाले.

सोमय्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही

यावेळी त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सोमय्यांशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओचा समावेश असणारा पेनड्राईव्ह सुपूर्द केला. सदर पेनड्राइव्हमध्ये मराठी स्त्रियांविषयी अश्लिल भाषेत संभाषण आहे. त्याचा योग्य तो तपास करा. मराठी महिलांविषयी अशा शब्दांत संभाषण करणारे किरीट सोमय्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रद्रोही आहेत, असे दानवे यावेळी सोमय्यांवरील आपली टीका अधिक धारदार करताना म्हणाले. वादग्रस्त पेनड्राइव्हचे अवलोकलन करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी दानवेंनी सभागृहात लावून धरली.

दुसरीकडे, यासंबंधीच्या चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कुणालाही पाठीशी न घालता वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी सोमय्यांवर अत्यंत गंभीर आरोप करत महिन्याभरापूर्वीच अनेक महिलांनी या प्रकरणी आपल्याशी संपर्क सादल्याचा दावा केला. तसेच यासंबंधीचे पेनड्राईव्ह सभागृहाच्या पटलावर सादर करण्याचा इशाराही दिला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजप साधनसुचितेच्या गोष्टी करते. संस्कृती रक्षणाच्या गप्पा हाणते. प्रस्तुत प्रकरणात काही महिलांनी महिन्याभरापूर्वीच आमच्याशी संपर्क केला. या सर्व महिला येत्या कालात किरीट सोमय्यांची वेगवेगली प्रकरणे उजेडात आणतील, असे अंबादास दानवे विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले.

विधिमंडळ अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधिमंडळाच्या पायऱ्यावर खोक्यावर बोके, पन्नास खोके एकदम ओके म्हणत घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झालेले दिसले.राष्ट्रवादी काँग्रेस दोन आठवड्यांपूर्वी पक्षामध्ये मोठी फूट पडली. अजित पवारांसह 9 आमदारांचा शपथविधी झाला. त्या पाठोपाठच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदाचे पावसाळी अधिवेशनाची वादळी होण्याची शक्यता आहे.

LIVE:

  • ग्रामपंचायत सदस्य जात प्रमाणपत्र पडताळणी या विषयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुद्दा माडंला. ते म्हणाले की, राज्यभरातील अनेक ग्रा.पं. सदस्यांचे जात प्रमाणपत्र ई-मेल वरती आलेले आहेत. परंतु तंत्रज्ञानातील शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना याबाबतीत काहीच कल्पना आलेली नाहीत. त्यामुळे जात प्रमाणपत्र अभावी त्यांचे ग्रामपंचायत सदस्य रद्द करणे अन्याय करणारे आहेत.
  • महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्र दिलेले आहेत. परंतु प्रशासनातर्फे व्यवस्थित कागदपत्रांची छाननी झाली नाहीत म्हणून ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द झालेले आहेत. या प्रक्रियेमध्ये जाणून बुजून ग्रामपंचायत सदस्यांवरती अन्याय होईल अशा पद्धतीने कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांने कार्य केलेले असेल त्यांना तात्काळ शिक्षा करण्यात यावी.
  • दानवे म्हणाले की, प्रशासकीय पातळीवर यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तहसीलदार व उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत राज्यभरातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे जात प्रमाणपत्र पडताळून घेतले जावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
  • महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील बेपत्ता होणाऱ्या मुलींचा मुद्दा मांडला. तसेच या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली.
  • आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाची संपूर्ण आणि सखोल चौकशी करणार असून कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. या प्रकरणी कोणाकडे माहिती असल्यास तक्रार करण्याची विनंती देखील त्यांनी केली.
  • सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या पटलावर पेन ड्राईव्ह ठेवला आहे. यात सर्व पुरावे असून या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
  • पानवाले आणि छोटे केमिस्ट दुकानदार हे ड्रग्सचे प्रमुख सोर्स असून रात्री 11 नंतर पानवाल्यांची दुकाने बंद करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच ड्रग्स सापडल्यावर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
  • नांदेडमध्ये एक तरुण मराठा आरक्षणप्रश्नी उपोषणाला बसला आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी लक्ष घालावे. मराठा आरक्षणप्रश्नी सरकारची भूमिका काय आहे, असा प्रश्न काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सरकारला विचारला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणाशी बोलून त्याला उपोषण सोडायला लावणार असल्याचे सांगितले.
  • विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या मुद्यावरून आक्रमक होत विरोधकांनी सभात्याग केला.
  • ‘शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी’ असे म्हणत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे काल या आंदोलनाला शरद पवार समर्थक आमदार अनुपस्थित असल्याने चर्चा रंगली होती. आज शरद पवार समर्थक आमदारांची उपस्थितीत दिसून आली. यात जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांचा समावेश होता.
  • मला योग्य संधी मिळाली तर सभागृहात सोमय्यांविरोधात पुरावे सादर करणार असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच त्यांनी भाजपवर निशाणा साधला. आम्ही शेतकरी प्रश्न आणि नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • भाजप नेते किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित झाला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर विधिमंडळात हे प्रकरण मांडणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विधिमंडळात आज हे प्रकरण गाजण्याची चिन्हे असून विरोधकांडकून ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

blank