29.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ आईचे दूध म्हणजे बाळासाठी अमृत – डॉ.अमरीश मोहबे

आईचे दूध म्हणजे बाळासाठी अमृत – डॉ.अमरीश मोहबे

0
63

blank

गोंदिया, दि.2 : आईचे दूध म्हणजे बाळासाठी अमृतच आहे. त्यामुळे स्तनदा मातांनी नवजात शिशुंना सुरुवातीचे 6 महिने फक्त निव्वळ स्तनपानच दिले पाहिजे. त्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्तनदा मातांना सहकार्य करुन संतुलित आहार दिला पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी केले.

        स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयात आज जागतिक स्तनपान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी जागतिक स्तनपान सप्ताहाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.

        प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, केटीएस रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.डी.जयस्वाल, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाई गंगाबाई रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन उईके, प्रमुख मार्गदर्शिका डॉ. सुवर्णा हुबेकर, अतिथी इंजि. शिखा पिपलेवार,  वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परियाल, डॉ. मीना वट्टी, डॉ. सुवर्णा उपाध्याय, मेट्रन निलू चुटे, अर्चना वासनिक, आहार समुपदेशिका स्वाती बन्सोड, कोमल अवस्थी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

        जागतिक स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या हस्ते करण्यात आले.  या जागतिक स्तनपान सप्ताह बाबत सविस्तर माहिती डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली.

        बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन उइके यांनी सांगितले की, यावर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहाच्या घोषवाक्य नुसार वर्किंग वूमनसाठी कामाच्या जागेवर बाळांना स्तनपान करण्यासाठी वातावरण निर्मिती व हिरकणी कक्षाची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे.

        यावेळी मेट्रन निलू चुटे यांच्या मार्गदर्शनात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्तनदा मातांना नवजात शिशुला स्तनपान देण्यासाठी प्रोत्साहित वातावरण निर्मितीची शपथ दिली.

       अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुतार म्हणाले, स्तनपान बाबत आजही खुप गैरसमज आहेत, ते दूर झाले पाहिजेत. स्तनदा मातेला येणारे सुरुवातीचे चीक दूध म्हणजे बाळाचे पाहिले लसीकरण आहे, ते दिलेच पाहिजे. हा स्तनपान सप्ताह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात प्रत्येक आरोग्य केंद्रातून साजरा करण्यात येत आहे. डॉ. मीना वट्टी यांनी देखील स्तनदा मातांना आरोग्यदायी टिप्स् दिल्या. शिखा पिपलेवार यांनी सांगितले की, आपल्याला कुपोषणमुक्त गोंदिया जिल्ह्याचा संकल्प करायचा आहे. तेव्हा नवजात शिशुंना सुरुवातीचे 6 महिने स्तनपान दिलेच पाहिजे.

      कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आहार समुपदेशिका स्वाती बन्सोड यांनी केले तर उपस्थितांचे आभार सिकलसेल समुपदेशिका नितु फुले यांनी मानले. यावेळी बाह्य रुग्ण विभागात स्तनपान बाबत माहिती देणारे सचित्र आरोग्य प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती, त्याचा लाभ रुग्ण व नातेवाईकांनी घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती नंदागवळी, सारिका तोमर, रजनी,  श्रीमती राहुलकर आणि स्टाफने सहकार्य केले.