
. विविध उपक्रमांनी साजरा झाला महसूल सप्ताह
गोंदिया, दि.8 : तहसिलदार कार्यालय गोंदिया ग्रामीण व अप्पर तहसीलदार गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात लाभार्थ्यांना विविध योजना व प्रमाणपत्राचा लाभ देण्यात आला. विविध उपक्रमांनी हा सप्ताह तालुकाभर साजरा करण्यात आला. महसूल सप्ताहात गरजू व लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन लोकाभिमुख कार्य करण्यावर भर देण्यात आला.
महसूल दिनाचे आयोजन करून १ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात नवनियुक्त ८ कोतवालांना नियुक्ती पत्र वितरण, अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजाराचे धनादेश वाटप, ११ लाभार्थ्यांना क्रिमिलेअर, उत्पन्नाचे दाखले, २० लाभार्थ्यांना कलम १५५ अंतर्गत दुरुस्त केलेले सातबारा वाटप, १४ पोलीस पाटील यांना नूतनीकरण प्रमाणपत्र वाटप व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते करण्यात आला.
‘युवा सांसद’ या कार्यक्रमाचे आयोजन नमाद महाविद्यालय गोंदिया येथे २ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. तसेच मनोहर म्युनिसिपल हायस्कूल व जे. एम. हायस्कूल येथे शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक जात प्रमाणपत्र, वय व राष्ट्रीयता प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमात पूर्व मान्सून व मान्सून कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घराचे, शेतीचे, फळबागांचे व जनावरांचे नुकसानीबाबत बाधित नागरिकांना देय असलेल्या सोई, सुविधा व नुकसान भरपाईकरिता ३६ अर्ज स्वीकारून त्याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. ही मदत लवकरात लवकर अदा केली जाणार आहे.
गोंदिया तालुक्यातील अतिदुर्गम मौजा जुनेवानी, दांडेगाव येथे ३ ऑगस्ट रोजी ‘महसूल अदालत’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तसेच विविध प्रकारचे दाखले नागरिकांना वितरित करण्यात आले. सोबतच रेशनकार्ड, संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना व फेरफार बाबतचे अर्ज स्वीकारण्यात आले. ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण तालुक्यात ‘जनसंवाद कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. सलोखा योजना, जमीन विषयक आवश्यक नोंदी अद्ययावत करणे व लोकांच्या महसूल विषयक समस्यांचे निराकरण करण्यात आले. या कार्यक्रमात खरेदी फेरफार ४६, वारसा फेरफार ५०, सलोखा योजना अर्ज १३, संजय गांधी योजना अर्ज ४३, श्रावणबाळ योजना अर्ज ६५, पांदण रस्ता अर्ज ५, सातबारा वाटप १९२, नमुना आठ-अ वाटप ९३ व सुधारित सातबारा वाटप २७ असा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंदिया येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संरक्षण दलात कार्यरत व निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रलंबित महसूल विषयक प्रश्न व समस्यांचा निपटारा करण्यात आला. ६ ऑगस्टला महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संवाद साधून प्रलंबित बाबी निकाली काढण्यावर भर देण्यात आला. ७ ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहाची सांगता झाली. वर्षभर लोकाभिमुख शासन प्रणाली अंतर्गत काम करण्याचा संकल्प या कार्यक्रमात करण्यात आला. तहसिलदार समशेर पठाण, अप्पर तहसीलदार विशाल सोनवणे यांनी या सप्ताहाचे उत्कृष्ट नियोजन केले.