
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन
गोंदिया, दि.9 : देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ आदरांजली वाहण्यासाठी ‘मेरी माटी-मेरा देश’ मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने ‘मेरी माटी-मेरा देश’ मोहीम 9 ऑगस्ट रोजी सुरु झाली असून आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानांतर्गत मातीचे पेटविलेले दिवे हातात धरुन पंचप्रण शपथ घेण्यात आली.
प्रभारी अपर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) चंद्रभान खंडाईत, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक उध्दव नाईक यावेळी मंचावर उपस्थित होते.
सामुहिक शपथ घेतांना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे म्हणाले, आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करु. देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु. भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करण्याऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु अशी शपथ घेण्यात आली. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
या सोबतच जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिलदार कार्यालयात पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण विभागाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत आज कार्यक्रम आयोजित करून पंचप्रण शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमात शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात “हर घर तिरंगा” अंतर्गत यावर्षी सुद्धा तिरंगा ध्वज लावण्याबाबत आवाहन करण्यात आले.