
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्या गटासोबत राहायचे यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहण्याचा निर्धार केला आहे. यामुळे ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटासोबत जाणार? या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
ईडीने नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने नुकताच त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
यासंबंधीच्या वृत्तानुसार, नवाब मलिक यांनी शरद पवारांसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार आहे, असे ते म्हणालेत.मागील 18 महिन्यांच्या काळात माझ्यासह माझ्या कुटुंबाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः मूत्रपिंडाच्या दुर्धर आजारामुळे मला स्वतःलाही मोठा त्रास सहन करावा लागला. सद्यस्थितीत प्रकृती काळजी घेण्यास माझे प्राधान्य आहे. त्यानुसार मी शहरातील सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घेईल. त्यानंतर महिन्याभरात माझी प्रकृती सामान्य होईल असा मला विश्वास आहे, असेही मलिक यावेळी म्हणालेत.
मलिक तुरुंगात अन् राष्ट्रवादीची 2 शकले
नवाब मलिक तुरुंगात गेल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार व अजित पवार अशी 2 शकले पडली. त्यामुळे तुरुंगाबाहेर आल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात राहणे पसंत करतात, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. पण आता त्यांनी स्वतःच आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
खडसेंनी भाजपत जाण्याचा केला होता दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा नवाब मलिक यांच्यावर डोळा असल्याचा दावा केला होता. नवाब मलिक यांच्यावर शरद पवारांचे खूप उपकार आहेत. त्यांनी त्यांना अनेक ठिकाणी संधी दिली. मंत्री केले. मलिक यांनीही पक्षासाठी प्रचंड मेहनत केली. त्यामुळे ते शरद पवार यांच्या सोबत राहतील असे मला वाटते. पण भाजप नवाब मलिक यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर देऊ शकते, असे खडसे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले होते.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी घेतली होती भेट
नवाब मलिक तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांची राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर छगन भुजबळ व स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांची भेट घेतली. स्वतः शरद पवारांनीही त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. यामुळे नवाब मलिक कोणता झेंडा घेणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते.