
● सार्व.वाचनालय व अभ्यासिका केंद्राचा ६ व वर्धापन दिन आणि यशवंतांचा सत्कार
देवरी,दि.१७- आजच्या विज्ञान-तंत्रज्ञाना आणि स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षा आणि इतर परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासमोर अनेक आवाहने उभी आहेत. त्या आव्हाने पेलत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी वेळेचा सदुपयोग करावा असे आवाहन देवरी नगरपंचायतीचे अध्यक्ष संजय उईके यांनी देवरी येथे बोलताना केले. दरम्यान, देवरी येथे आयोजित एका कार्यक्रमात सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्राचा ६ वा वर्धापन दिन आणि यशवंतांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन काल १६ रोज गुरूवारी करण्यात आले होते.
स्थानिक दुर्गा चौक येथील नगरपंचायत आणि देवरीच्या दिनबंधु ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्र देवरी द्वारा आयोजित सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्राचा ६ वा वर्धापन दिन आणि स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षेत यशवंत झालेल्या यशवंतांचा सत्कार समारंभाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी नगर पंचायतीच्या उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, सभापती नूतन सयाम,कमलाताई मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यादोराव पंचमवार,दीपक अग्रवाल,नगरसेविका सीता रंगारी,संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार,देवानंद मेश्राम आदी मान्यवर यांची उपस्थिती होती. दरम्यान, अभ्यासिका केंद्रामध्ये सातत्याने अभ्यास करून भारतीय वायुसेनेतील मल्टी टास्किंग स्टाफ या पदावर निवड झालेले यशवंत रोहित ब्राह्मणकर, इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत तालुक्यातून प्रथम आलेली कुमारी जानवी शाहू, महसूल विभागाच्या कोतवाल या पदासाठी झालेला परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवून यशवंत झालेले सुनील उके या तिन्ही यशवंतांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बोलताना श्री पंचमवार म्हणाले की, शहरातील अभ्यासिका केंद्रामध्ये आपल्या क्षेत्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश घेणे शक्य नसल्याने त्यांना मदत व्हावी हेतूने या अभ्यासिका केंद्राची स्थापना करण्यात आली. यामुळे या अभ्यासिका केंद्राचे महत्व समजून घेत विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील आयुष्यात भरघोष यश संपादन करावे. यावेळी उपस्थितांना पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अभ्यासिका केंद्रातील अभ्यासकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार यांनी केले. संचालन ग्रंथपाल हर्षवर्धन मेश्राम यांनी आणि उपस्थितांचे आभार संस्थेचे विश्वस्त दीपक लांजेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे विश्वस्त, स्वयंसेवक आणि अभ्यासिका केंद्रातील अभ्यासकांनी सहकार्य केले. यावेळा मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.