38.2 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home Top News ताडोबा सफारी ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली १२ कोटींची फसवणूक

ताडोबा सफारी ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली १२ कोटींची फसवणूक

0
40

blank

चंद्रपूर : ताडोबा जंगल सफारीसाठी ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली सरकारची १२ कोटींहून अधिकची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात रामनगर पोलिसांनी अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन आरोपींविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही आरोपी शहरातील उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

ताडोबा अंधारी अभयारण्याचे विभागीय वन अधिकारी सचिन उत्तम शिंदे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, ताडोबा जंगल सफारीसाठी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन नावाच्या कंपनीमध्ये ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यांच्यासोबत करार करण्यात आला. ही कंपनी चंद्रपूर येथील गुरुद्वारा रोड येथील अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन भावांची आहे.

या करारानुसार, ही कंपनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमिशनच्या आधारावर ऑनलाइन सफारी बुकिंग करू शकते. २०२० ते २०२३ या कालावधीत या कंपनीला केलेल्या बुकिंग अंतर्गत २२ कोटी २० लाख एवढी रक्कम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनकडे जमा करायची होती, मात्र या कंपनीने केवळ १० कोटी जमा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. विशेष म्हणजे कंपनीने ताडोबा व्यवस्थापनाला १२ कोटी १५ लाख ५० हजारांनी गंडा घातला आहे. चार वर्षांच्या लेखापरीक्षणानंतर ही बाब समोर आली. सरकारी पैशांची उधळपट्टी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली.पोलिसांनी अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचकल डॉ. जितेन्द्र रामगावकर यांना विचारले असता प्रकरण न्यायालयात आहे. तरीही वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या कंपनी विरुद्ध कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

blank