डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0
39

गोंदिया,दि.22 – सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी आणि बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना आदिवासी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येते.  या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज  www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर दाखल करावा. अधिक माहितीसाठी क्षेत्रिय स्तरावर संबंधित जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गोंदिया पंचायत समिती कृषी विभागाचे अतुल येडे यांनी केले आहे.

योजनेंतर्गत नवीन विहिर (रू.2.50 लाख), जुनी विहिर दुरूस्ती (रू. 50 हजार), इनवेल बोअरिंग (रू. 20 हजार), पंप संच (रू. 20 हजार) वीज जोडणी आकार (रू. 10 हजार), शेततळ्यांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण (रू. 1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच – रू. 50 हजार किंवा तुषार सिंचन संच – रू. 25 हजार), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत पीव्हीसी पाईप (रू. 30 हजार), परसबाग (रू. 500/-) या बाबींवरही अनुदान अनुज्ञेय  आहे.

योजनेच्या लाभासाठी लाभार्थी संबंधित प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. लाभार्थीने जातीचा वैध दाखला, जमिनीच्या सातबारा व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रू. 150000/- चे मर्यादेत. उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थिंची जमीनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे, असे निकष आहेत, असे कृषी आयुक्तांनी कळविले आहे.

वरील नमुद बांबीचा लाभ घेन्याकरीता आवश्यक कागदपत्रे

•सात बारा
•नमुना आठ अ
•उत्पन्नाचे प्रमाणपत्र
•जातीचे प्रमाणपत्र
•सातबारावर एकापेक्ष अधिक नावे असतील तर समंत्तीपत्र
•आधार कार्ड
•या कागदपत्रांची आवशकता भाषणार आहे.

टिप -डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा क्रांती योजना लाभ घेण्याकरीता शेतक-यांची जमीन धारणा 0.40 आर ते 6 हेक्टरच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे.