गोंदिया : नागपूूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वैमानिकाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि विमान चक्क धावपट्टीऐवजी मिहानमधील ‘टॅक्सी-वे’वर उतरवले. सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही.गोंदियामध्ये फ्लाईंग क्लबचे प्रशिक्षण देणारे हे विमान होते. मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या इंदिरा गांधी उड्डाण अकॅडमीच्या महिला वैमानिकाने गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून झेप घेतली होती. हे विमान नागपूर विमानतळावर उतरून परत गोंदियाला जाणार होते. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचा विमानाशी संपर्क तुटला. विमानाचा शोध सुरू झाला, तेव्हा हे विमान मिहानमध्ये उतरल्याचे समजले. फ्लाईंग क्लबचे अधिकारी मंगळवारी दुपारनंतर नागपुरात दाखल झाले. रात्री आठ वाजताच्या सुमारास या विमानाने गोंदियाकडे झेप घेतली.