देवरी चेकपोस्टवर एंट्रीच्या नावाखाली होणारी अवैध लूट थांबवावी

0
16

■ देवरी तालुका शिवसेना(उध्दव ठाकरे ) पक्षाचे तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांची मागणी.
—————————–
देवरी,दि.२८: महाराष्ट्र- छत्तीसगढ़ सिमेवर असलेल्या सिरपुर येथील परिवहन विभागाच्या आर.टी. ओ. चेकपोस्ट वर एंट्री च्या नावाखाली ट्रक चालक-मालक यांच्याकडून होणारी अवैद्यरित्या वसुली थांबवून संबंधीत अधिका-यांवर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देवरी तालुका शिवसेना (उध्दव ठाकरे ) पक्षाचे तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांनी आपल्या इतर पदाधिका-यां सोबत बुधवार (ता.२२ नोव्हेंबर) रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देवरीचे तहसीलदार अनिल पवार यांच्या मार्फत सादर केली.
सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र- छत्तीसगढ़ सिमेवर असलेल्या सिरपुर येथील राज्य परिवहन विभागाच्या आर.टी. ओ. चेकपोस्ट वरुन दररोज सहा ते आठ हजार ट्रक येणे-जाणे करीत असतात. येथील चेकपोस्ट वर अंदाजे आठ ते दहा आर.टी.ओ. यांची ड्युटी असते. प्रत्येक आर.टी.ओ. ४८ तास ड्यूटी करीत असतात. ड्युटीवर येणारे आर. टी. ओ. हे आपल्या सोबत तीन ते चार आपले लोक घेवून येतात. व त्यांच्या मार्फत चेकपोस्ट वरुन येणा-या जाणाऱ्या गाडी चालक व मालक यांच्या कडुन या चेकपोस्टवर एंट्री च्या नावावर प्रत्येक ट्रक चालकाकडून प्रत्येकी २००/- रुपये, ३००/- रुपये, ५००/- रुपये, १०००/- रुपये अशारित्या अवैधपणे वसुल करुन ट्रक चालकांची पिळवणुक करतात. ट्रक चालक नाई-लाजाने अवैधरित्या एंट्री ची रक्कम जमा करतात.
आर.टी.ओ. च्या या कारभारावर अनेकदा तक्रारी झालेल्या आहेत. परंतु त्यांचा हा गोरखधंदा बंद झालेला नाही. यात संबंधित आर.टी.ओ. हे १० ते १५ लाख रुपये प्रत्येक दिवशी ट्रक चालकाकडुन जमा करतात. सदर रक्कम स्वतःच्या खिशात घालतात. त्यामुळे येथील आर.टी.ओ. महिण्याला करोडो रुपयाचा शासनाचा महसुल बुडवत आहेत.
करीता महोदय आपल्या मार्फत महाराष्ट्र- छत्तीसगढ़ सिमेवर असलेल्या आर.टी.ओ. चेकपोस्ट ची चौकशी करून ट्रक चालक व मालक यांच्याकडून अवैधपणे होणारी पैशाची लुबाडणूक थांबवावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.
या निवेदनाच्या प्रती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, अजित पवार,
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेता
विजय वडेट्टीवार, जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबआत्राम, गोंदियाचे जिल्हाधिकारी साहेब, गोंदियाचे पोलीस अधिक्षक साहेब, देवरीचे ठाणेदार,
गोंदियाचे जिल्हा परिवहन अधिकारी, या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे व गोंदिया
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप-अधिक्षक साहेब यांना ही सादर करण्यात आल्या आहेत .
निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा, देवरी शहर प्रमुख राजा भाटिया, उप-तालुका प्रमुख डालचंद मडावी यांच्या सह बहुसंख्य शिवसैनिकांचा समावेश होता.