▪️डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिन- शिक्षण बचाव सहविचार सभा सम्पन्न
गोंदिया :- भारतातील सर्व-सामान्य लोकांच्या जगण्याचा व विकासाच्या मुख्य आधारापैकी एक आधार शिक्षण आहे. परंतु हे शिक्षण सरकार नष्ट करू पाहत आहे. (सरकारी) सार्वजनिक शिक्षणावर सरकारकडून दिवसेंदिवस घाला घालण्यात येत आहे. शिक्षणाचे खाजगीकरण, कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण व सार्वजनिक शिक्षणाची कत्तल हेच आजच्या सरकारचे धोरण आहे. याच धोरणाचा भाग म्हणून ० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद पाडण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी गावची शाळा बंद करून गावापासून दूर असलेल्या शाळेत जायला सांगणार आहे. याला ते शाळा संकुल म्हणतात. गावची शाळा बंद झाल्यास विद्यार्थी कायमचे शिक्षणातून बाहेर फेकले जातील. हा गंभीर प्रश्न आहे. शिक्षण हा विद्यार्थ्यांचा संविधानिक मूलभूत अधिकार आहे. सरकारने समान, दर्जेदार, मोफत व सरकारी खर्चाने शिक्षण उपलब्ध करून देणे त्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. परंतु सरकार मात्र शाळा बंद करू पहात आहे. यासाठी समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन संघर्ष करायला हवा. आज संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृति दिन आहे. बाबासाहेबांनी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिलं. एकदाचा कुठलाही नुकसान पत्करायला तैयार आहे पण शिक्षणाच्या लाभाचा नुकसान पत्करायला तैयार नाही असं ठणकावून बाबासाहेबांनी सांगितलं. त्यांच्या स्मृती दिना निमित्त प्रेरणा घेत बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर जाऊन आपण या शिक्षण वाचवण्याच्या चळवळीत सहभागी व्हा” अशा आशयाचे आवाहन शिक्षण बचाव समन्वय समिति विदर्भ समन्वयक रमेश बीजेकर यानी व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळा बंद होऊ नए या साठी जनजागृति होने गरजेचे आहे, या उद्देशाने शिक्षण बचाव समन्वय समिती विदर्भच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली व पुढील काळात ग्राम स्तरावर जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी जागृती करण्याचे संकल्प करण्यात आले. या प्रसंगी शिक्षण बचाव समन्वय समितितर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 ही पुस्तिका भेट करण्यात आली.
या सभेचे प्रास्ताविक प्रा. डॉ.दिशा गेडाम यांनी केले, संचालन सावन कटरे व आभार प्रेमेन्द्र चव्हाण यांनी मानले.
प्रभाकर गेडाम (चंद्रपुर), वसंत गवळी, सी.पी. बिसेन, भोजराज ठाकरे, प्रा.रोमेंद्र बोरकर, सुनील भोंगाळे, रवी भांडारकर, सईम कुरैशी, मोहसीन खान, नीलकंठ चीचाम, प्रा. किशोर वासनिक, परमानंद मेश्राम, पी.बी.बघेल, पी.डी.चौहान , प्रा. यू.एन. डोलारे, एस.पी. कोहळे, पुंडलिक तायडे (नागपूर) तसेच सविंधान मैत्री संघ, युवा ग्रॅज्युएट फोरम, स्टुटडंस राईटस असोसिएशन, विज्यूक्टा, ओबीसी अधिकार मंच, बहुजन युवा मंच, ओबीसी सेवा संघ, ओबीसी संघर्ष समिती आदी गोंदिया जिल्ह्यातील समविचारी सामाजिक शैक्षणिक मित्र संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी चंद्रपूर येथे विदर्भ विभागीय शिक्षण बचाव परिषदेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.