सडक अर्जुनी: गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका व अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये २६ पोलीस पाटील पदाच्या रिक्त जागाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रियेदरम्यान २६ जागकरिता १५४ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी १४९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आणि दोन उमेदवारांची अर्ज अपात्र ठरले. या १५४ उमेदवारांनी परीक्षा दिल्यानंतर, निकाल सुद्धा हाती आला. परंतु काही उमेदवारांनी या परीक्षेवर आक्षेप नोंदविला. प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप अपात्र उमेदवार उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलनावर बसले असून भरती प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात घेण्यात आलेली पोलिस पाटील पदभरती वादाचा भोवर्यात सापडली आहे. या भरती प्रक्रियेत अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यातच सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव या दोन तालुक्यात घेण्यात आलेल्या भरती प्रक्रिया निकाल लागल्यानंतर पुन्हा वादात सापडली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात २६ उमेदवारांची भरती झाली. त्या सर्व उमेदवारांचे सीसीटीव्ही फुटेज, प्रश्नपत्रिकाची सत्य प्रत, आणि उपविभागीय अधिकारी वरुनकुमार शाहरे यांचे कॉल रेकॉर्डिंग व पेपर तपासणीचे सीसीटिव्ही फुटेज देण्यात यावी तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा, या मागणीला घेऊन १३ फेब्रुवारीपासून अपात्र उमेदवार उपोषणावर बसले आहेत. ज्या उमेदवारांना पास करण्यात आले, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचा आरोप अपात्र उमेदवारांनी केला आहे. प्रकरणाची चौकशी करून पदभरती रद्द करावी तसेच दोषी अधिकार्यांना निलंबित करण्यात यावे, जे उमेदवार उत्तीर्ण झालेत त्यांचे पेपर व सीसीटीव्ही फुटेज आणि पेपर तपासणीचे व्हिडिओ फुटेज पाहण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यामुळे उपोषणावर प्रशासन यावर कोणती भुमिका घेत, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
पोलिस पाटील पदभरतीत घोळ झाल्याचा आरोप करीत अपात्र उमेदवार उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणावर बसले आहेत. या दरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून प्रशासन दखल घेताना दिसून येत नाही. यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये रोष दिसून येत आहे. उपोषणात देवानंद हत्तीमारे, योगेश कोरे, लोकेश तरोने, मुकेश कोरे, महेंद्र चूटे, प्रवीण तवाडे, निलेश लेंडे, अतुल हत्तीमारे, सेखर सुरसांउत, नागेश पटणे, राहुल काणेकर, तपस्विनी सुरसांउत, संगिता डोये, साधना नरेश कडूकार, सुशीला लोकेश बनकर यांच्यासह बामणी खडकी, मंदीटोला, कोसमघाट, खाडीपार, कोहमारा, पांढरवाणी/रय्यत येथील उमेदवार सहभागी झाले आहेत.
उपविभागीय अधिकारी वरुनकुमार सहारे यांच्या फोनची कॉल रेकॉर्डींग व पेपर सुरू असतानीचे व पेपर तपासणीचे व्हिडियो रेकॉर्डींग प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीसमोर दाखविण्यात यावे.
– योगराज कोरे (उपोषणकर्ता)
डिसेंबर महिन्यात झालेल्या पोलिश पाटील कोतवाल भरती मध्ये दोन वेळा गुण देण्यात आले. दोन वेळा पेपर तपासणी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी यांनी राजपत्रचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी.
– देवेंद्र हत्तीमारे (उपोषणकर्ता)