अर्जुनी मोरगाव -तालुक्यातील प्रतापगड जवळ असलेल्या पहाडीवर महाशिवरात्रीच्या निमित्याने लाखोंच्या संख्येने भाविक महादेव दर्शनासाठी येतात. ही यात्रा जवळपास आठ दिवस चालते. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त मोठ्या श्रध्देने महादेव दर्शनासाठी हजेरी लावतात. त्यामुळे प्रतापगड गावापासून तर पहाडावर असलेल्या महादेव मूर्तीपर्यंत येथे विविध दुकाने लावली. यासाठी जिल्हा प्रशासन भाविकांच्या सेवेसाठी तत्पर असते. सेवाभावी मंडळी व संस्था यांचेकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मुळात येथील निसर्ग हा येणाऱ्या भाविकांना भुरळ घालतो. संमिश्र प्रकारच्या वृक्षांच्या जाती आणि जंगलाचे घनदाट रूप पर्यटकांनाही आकर्षित करते. मोठ्या शहरापासून दूर असलेल्या या प्रतापगडच्या निसर्गरम्य वातावरणात रममाण होण्यासाठी महादेव दर्शनाच्या निमित्याने बायाबापडे आपल्या मुलाबाळासह येथे वर्षातून एकदा भेट देतात.
मात्र या यात्रेत लावण्यात आलेल्या दुकानामुळे स्थानिक स्तरावर मोठया प्रमाणात प्लॅस्टिक व कचरा प्रदूषण होणे स्वाभाविक आहे. त्याचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवून एक कौतुकास्पद कार्य केले आहे. प्रतापगड पहाडावरील रस्त्याच्या दुतर्फा कडेला पडून असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या संकलित करून व महादेवाच्या पहिल्या पायरीजवळ स्वच्छता अभियान राबवून लोकांना हा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मोतीलाल दर्वे यांनी पुढाकार घेतला. रासेयोच्या 40 स्वयंसेवकांच्या सहभागातून स्वतःहून याठिकाणी केलेल्या श्रमदानातुन स्वच्छता या उपक्रमाचे येथील सरपंच श्री भोजराम लोगडे यांनी कौतुक केले. रासेयो स्वयंसेवक तन्मय चांदेवार, रागिनी पारसमोडे, कैलास नंदरधने, श्रद्धा कुंभरे, चैतन्वी पुस्तोडे, रागिणी कापगते, श्रीवर्धन गोंडाने, धिरज रंगारी, रिकीत गजबे, राम नैताम, प्राजक्ता मेश्राम व सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या परिसराचे सौंदर्य अबाधित राहावे याचे भान ठेऊन केलेल्या या रासेयो पथकाच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले.