श्रींच्या पालखीस वाशिमकरांनी दिला निरोप;२ हजार २३७ जणांना आरोग्य सेवा

0
44
वाशिम,दि.२४ जून” भेटी लागी जीवा, लागलीसे आस ” म्हणत चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या संत श्री गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचे १९ जून रोजी जिल्ह्यात आगमन झाले होते. मेडशी, डव्हा, मालेगाव, शिरपूर, चिंचांबापेन, मसलापेन, किनखेडा असा प्रवास करून दि.२३ रोजी पालखीने पहाटे हिंगोली जिल्ह्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. हिंगोली जिल्ह्यातील वाढोणा गावाच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर वाशिमकरांचा उर भरून आला होता. फक्त ५ दिवसांच्या पालखीच्या सहवासाने वाशिमकरांना चांगलाच लळा लावला होता. इतरवेळी कर्तव्यपरायण असणारा आणि आपल्या सर्व भावनांना आवर घालून आपले काम करणारा आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी वृंद यांचा सुद्धा पालखीला निरोप देताना कंठ दाटून आला होता.
वाशिम जिल्ह्यात प्रवेश केल्यापासून ते हिंगोली जिल्ह्यात पालखी प्रवेश करेपर्यंत तब्बल ९१ किलोमीटरच्या प्रवासात आरोग्य विभागाने पालखीच्या सोबत राहून वारकरी व भाविक मिळून एकूण २२३७ इतक्या जणांना आरोग्य सेवा दिली.
 दि.२३ जून रोजी पालखीची आरोग्य विषयक सूत्रे वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी हिंगोलीचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग फोपळे यांच्याकडे सोपवली. त्यावेळी वाशिम जिल्हा परिषदेचे जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी स्वप्निल चव्हाण, रिसोड तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रामहरी बेले, आरोग्य सहायक राजेंद्र घुगे, जिएनएम अमोल थोरवे, आरोग्य सेवक सुमेध भगत, संदीप नप्ते, कार्यक्रम सहायक अक्षय वानखेडे आदी उपस्थित होते.
कौंडण्यपूरची विठ्ठल रुक्मिणी पालखीचे दि.२० जून रोजी वाशिम जिल्ह्यात आगमन झाले असून दि.२४ जूनपर्यंत पालखी वाशिम जिल्ह्यात असणार आहे. आत्तापर्यंत या पालखीमध्ये एकूण २३७ भाविकांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे.
पालखी सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी वाशिमचे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी वेळोवेळी सूचना देऊन मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी देऊन त्यावर नियंत्रण ठेवले. पालखी सोहळ्यात दिवस रात्र सेवा देणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.