पुरग्रस्त गावातील सहा गरोदर मातांना ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे हलविले

0
220

गोंदिया,दि.२४ः तालुक्यात 22 जुलै पासुन सततधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे.त्यातच कासा-काटी मार्गावरील वैनगंगा व बाघ नदीला पूर आल्याने पुरामुळे मार्ग बंद झाले.पुरामुळे मार्ग बंद झाल्याने या गावातील गरोदर मातांना आरोग्याच्या सोयीपासून वंचित राहता येऊ नये याकरीता तसेच पुरग्रस्त गावातील गरोदर मातांना प्रसूती संबंधाने आरोग्याची निकड व गुंतागुंत न होण्याच्या दृष्टिकोनातून त्या कार्यक्षेत्रातील सहा गरोदर मातांना प्रसंगावधान राखत ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथे हलविण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अँबुलंन्स वाहनाने हलविलेची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र काटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमर खोब्रागडे यांनी दिली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र काटी अंतर्गत उपकेंद्र कासा कार्यक्षेत्रातील सहा गरोदर मातापैकी ग्राम कासा येथील भारती चौधरी,करीना पाचे,अनसती पाचे,गुणिता चमटे,निशा मातरे,गीता चौधरी यांची अपेक्षित प्रसूतीची तारीख जवळ असताना गुंतागुंत होऊ नये म्हणून तात्काळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ.अमर खोब्रागडे यांनी दिली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचार्यांना मुख्यालयी राहुन नदीकाठच्या गांवावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश सुध्दा दिले आहेत.
23 जुलै रोजी तालुक्यातील कासा-काटी अतिवृष्टी पुरग्रस्त गावामध्ये आरोग्य प्रशासनाच्या आरोग्य चमुमध्ये गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शहजादा राजा, प्राथमिक आरोग्य अधिकारी काटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमर खोब्रागडे,सामुदायिक आरोग्य अधिकारी शिवानी सोनवाने,तालुका आरोग्य सहायक आत्माराम वंजारी, आरोग्य सहाय्यक ताजने,आरोग्य सेविका दंधारे, आरोग्य सहायीका चाचेरे, स्टाफ नर्स यादव,आशा सेविका अंजीरा खैरवार, किरण चौधरी व सुनिता जमरे यांनी विशेष तत्परतेने सर्व सहा गरोदर मातांना ग्रामीण रुग्णालय रजेंगाव येथे हलविण्यात पुढाकार घेतले असून ग्रामीण रुग्णालय रजेंगांवचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुप्रिया बोरकर यांनी सहाही गरोदर मातांना भरती करुन आरोग्य सेवा प्रदान केली आहे.