
- शासकीय योजनांचा लाभ द्या
- 1 ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहचे आयोजन
गोंदिया दि.25 : शासनाच्या महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल दिन व महसूल सप्ताह साजरा करण्यात येतो. या निमित्ताने लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करून महसूल सप्ताह साजरा करण्यात यावा. महसूल सप्ताहात जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी महसूल विभागाला केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज 1 ऑगस्ट महसूल दिन व महसूल सप्ताह साजरा करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, भैय्यासाहेब बेहरे, मानसी पाटील व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यावेळी उपस्थित होते.
1 ऑगस्टला महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना लागणारी प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. 2 ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 3 ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय अभियान, 5 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्टला एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा व 7 ऑगस्टला महसूल संवर्गातील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार व समारोप असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
महसूल सप्ताहात शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात यावी तसेच त्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आपल्या विभागाकडे येणाऱ्या नागरिकांना केवळ सप्ताहातच नाही तर सदासर्वकाळ सन्मानाची वागणूक देण्यात यावी. अधिकारी कर्मचारी यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नागरिकांना सहकार्य करावे. आपल्या विभागाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य करावे अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी महसूल सप्ताहात आठवडाभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा समजून सांगितली. या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी अधिकारी कर्मचारी यांना सहभागी करून घेण्यात यावे असे त्या म्हणाल्या.