वाढदिवस अध्यक्षांचा,तक्रार कृषी सभापतींची;निलंबित उपाध्यक्षांचा परिचर!

0
659

* परिसर स्वच्छ न करणे परीचाराला भोवले
* परीचारासाठी जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली, घेतली मुकाअ यांची भेट
गोंदिया,दि.२५ः – जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अल्पोपहार कार्यक्रमामुळे उपाध्यक्ष व कृषी सभापती यांच्या दालनापुढे अस्वच्छता आढळल्याने कृषी सभापती यांनी स्वच्छतेकरीता केलेल्या सामान्य प्रशासन विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या कार्यालयातील एका परीचरावर निलंबनाची कार्यवाही 24 जुलै रोजी करण्यात आली. त्यामुळे परीचराच्या बचावासाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या मोठ्या नेत्याने 25 जुलै रोजी दुपारी 2 वाजता आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतल्याने हे निलबंन प्रकरण समोर आले.त्यामुळे काम कुणाचे, नाम कुणाचे व कार्यवाही झाली कुणावर? असा प्रश्न जिल्हा परिषद वर्तुळात सुरु होती. विशेष म्हणजे एका परीचरासाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली याचेही नवल कर्मचाऱ्यांमध्ये पहावयास मिळत होते.
19 जुलै रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यास येणाऱ्यासाठी अल्पोपहाराचे स्टॉल लावले होते.सदर स्टॉल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजी. यशवंत गणवीर व कृषी सभापती रुपेश (सोनू) कुथे यांच्या कार्यालयापुढील वर्हांड्यात थाटले होते. सायंकाळपर्यंत सदर कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर शनिवार व रविवार असल्याने कार्यालय बंद होते. सोमवारी 22 जुलै रोजी कार्यालय नियमितपणे सुरू झाले.मात्र या परिसरातील स्वच्छता व्यवस्थित न केल्याने जिल्हा परिषदेचे कृषि सभापती रुपेश कुथे यांना त्रास जाणवल्याने त्यांनी याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम यांनी लागलीच ॲक्शन घेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश दिले.त्यानंतर उपाध्यक्ष यांच्या कार्यालयातील परिचर जैन यांना स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली मात्र,त्यांनी ते कार्य पार न पाडल्याने त्यांना याकरीता जबाबदार धरत 24 जुलै रोजी सरळ निलंबितच करण्यात आले.वास्तविक कुठल्याही कर्मचाऱ्याला निलबिंत करण्यापुर्वी नोटीस देऊन त्याचे म्हणने एैकून घेतले जाते,मात्र याप्रकरणात सरळ निलबंनाचीच कारवाई करण्यात आल्याने परिचर वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
सदर कर्मचारी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे नातलग असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बड्या नेत्यांने आज 25 जुलै रोजी लगेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या एका सभापतीचे पती, जिल्हा परिषद महिला सदस्यांचे पती,एका मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच शहर व ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे वाढदिवस अध्यक्षांचा, तक्रार कृषी सभापतींची तर निलंबन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या परीचराचे करण्यात आल्याने व त्यासाठी राष्ट्रवादीचं पुढे सरसावल्याने दिवसभर चर्चेचा विषय ठरला होता. सदर परीचाराच्या निलंबना ऐवजी स्टॉल लावणाऱ्यावर स्वच्छतेची जबाबदारी देत कार्यवाही व्हायला हवी होती, अशीच चर्चा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.