
नागपूर : महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची अंमलबाजवणी, प्रचंड वाढलेली महागाई व महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. महिलांचे हे तीन ज्वलंत प्रश्न घेऊन शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष ॲड. नंदा पराते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी व्हॅरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. राज्यातील महायुती सरकार व केंद्रातील भाजपा सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात महिला काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण मंजूर केले परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. सरकारने या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जनगणनेची अट घातली आहे. २०२१ साली होणारी जनगणना अद्याप केली नाही. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने जनगणनेसाठी कोणतीही तरतूद केली नाही. या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे तसेच या आरक्षणात एससी, एसटी, ओबीसी घटकांच्या महिलांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. महागाई प्रचंड वाढलेली असून गृहिणींना महागाईमुळे घर चालवणे कठीण झाले आहे, भाजपा सरकारने महागाईवर नियंत्रण आणून दिलासा द्यावा. महिलांवर देशभर अत्याचार वाढले आहेत, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कडक उपाययोजना करावी, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, या महिला काँग्रेसच्या मागण्या आहेत.
महागाईतून सुटकासाठी प्रति महिना साडेआठ हजारांची महालक्ष्मी योजना लागू करा, लोकसभा व विधानसभा निवडणूकीत एससी, एसटी, ओबीसीमधील महिलांना आरक्षण मिळालेच पाहीजे. अश्या महिलांनी घोषणा यावेळी महिलांना दिल्या. या आंदोलनात कल्पना द्रोणकर, चारुलता भट, संगीता उपरीकर, मंदा बोबडे, मीना गायकवाड, वंदना बेंजामिन, अनिता हेडाऊ, शकुंतला वट्टीघरे, जयश्री धार्मिक, वंदना मेश्राम, ज्योती ढोके, सुरेखा लोंढे, रेखा थूल, वैशाली अड्याळकर, मंजू पराते, माया नांदुरकर, कोमल वासनिक यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.