
गोंदिया, दि.30 : आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी 22 ते 24 जुलै 2024 दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी येथे भेट दिली. त्यांनी देवरी प्रकल्पांतर्गत समाविष्ठ असलेल्या 11 शासकीय आश्रमशाळांना भेटी देवून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेतला. यामध्ये राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ या महाराष्ट्र शासनाच्या योजनेची प्रचार व प्रसिध्दी करून एकही आदिवासी महिला या योजनेपासून वंचित राहू नये याकरिता आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आदिवासी बचत गटांना याचे महत्व पटवून दिले. तसेच जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांना भेटी देवून या शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीपासून हाती घेण्यात आलेले नविन उपक्रम उत्तम प्रकारे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
इंग्रजी भाषेत संभाषण, ब्राईटर माईंड उपक्रमाव्दारे विद्यार्थ्यांची एकाग्रता शक्ती वाढविणे तसेच IIT, NEET, JEE परिक्षेचे नियोजन हे शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीपासून करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. CET च्या परीक्षेत भरघोस यश प्राप्त झाले असल्याचे तसेच या प्रकल्पामधील 3 आदिवासी विद्यार्थी CLAT परीक्षेत यश प्राप्त केल्याबाबत त्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा, प्रेरणादायी मार्गदर्शन सत्र प्रत्येक आठवड्यात घेणे. आदिवासी मुलांमध्ये इंग्रजी बोलण्याचे धाडस निर्माण व्हावे या उद्देशाने शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळया मुद्दयांवर इंग्रजी बोलण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. जेणेकरून बाहेरच्या ठिकाणी शिकायला गेल्यास त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होवू नये. हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी सर्व अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याच्या सूचना अपर आयुक्तांकडून देण्यात आल्या.
देवरी प्रकल्पातील गोंडवाना सांस्कृतिक भवन देवरी व तहसिल कार्यालय सालेकसा या ठिकाणी सर्व आदिवासी महिला बचतगट, उमेद बचत गट, माविम बचत गट, CFR बचतगट यांचेकडून विविध तयार करण्यात आलेल्या विविध कलाकृती/ साहित्यांना योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून विकास साधण्याचे प्रयत्न करण्यात यावे. सर्वात महत्वाचे म्हणजे या भागातील आदिवासी बांधव अनेक विषयात पारंगत आहेत, मात्र त्यांनी तयार केलेल्या साहित्याला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याकरिता आपण ट्रायबल्स बाजार नावाचा एक ई-कॉमर्सचा प्लॅटफॉर्म तयार करून नागपूर येथे गोंदिया जिल्ह्याच्या बचत गटांच्या साहित्याचे एक मार्केट तयार करून देण्याचा आपला मुख्य उद्देश आहे असे त्यांनी सांगितले. सदर उपक्रमासोबत जुळून आदिवासी बचत गटांचा सर्वांगिण विकास साधण्याचे उपस्थित आदिवासी महिला बचत गटांना अपर आयुक्तांकडून आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकासाकरीता प्रयत्न करण्याच्या सूचना अपर आयुक्तांकडून देण्यात आल्या.
आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण व शहरी घरकुल योजना, केंद्रवर्ती अर्थसंकल्प अशा विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी देवरी उमेश काशिद यांनी केले.