
अर्जुनी मोर.दि.३१ः ग्रामपंचायतींना आज अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्या शासन स्तरावरून सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करावे असे आशयाचे निवेदन अर्जुनी मोरगाव तालुका सरपंच/ उपसरपंच संघटनेच्या वतीने 31 जुलै रोजी आमदार मनोहर चंद्रकापुरे यांना देण्यात आले.
निवेदनानुसार उच्च न्यायालयाने रद्द केलेले पंधरा लाख रुपये पर्यंतचे काम करण्याचे अधिकार शासन निर्णय काढून पुन्हा ग्रामपंचायतींना बहाल करण्यात यावे, सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे मानधनात वाढ करण्यात यावे,ग्रामीण भागातील घरकुलांसाठी तीन लाख रुपये प्रति घरकुल देण्यात यावे,सहा ब्रास रेती मोफत देण्यात यावी, मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या कुशल कामाचे देयके तीन महिन्याच्या आत ग्रामपंचायतीला देण्यात यावे, जिल्हास्तरावर सरपंच भवन निर्माण करण्यात यावे,आवास योजनेचे देयके त्वरित देण्यात यावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत. सदर मागण्या पूर्ण न झाल्यास सात आगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील सर्व सरपंच उपसरपंच काम बंद आंदोलन करणार असून येणाऱ्या 28 ऑगस्ट पासून मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे. तरी ग्रामपंचायतीच्या या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण विधानभवनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा ग्राम विकास मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी मागणी ही सरपंच संघटनेने आमदार चंद्रिकापुरे यांच्याकडे केली. यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी सदर मागण्या संदर्भात आपण नक्कीच पाठपुरावा करून त्या मागण्या शासन स्तरावरून सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन सरपंच उपसरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. निवेदन देतेवेळी सरपंच उपसरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भोजराज लोगडे, सचिव लक्ष्मीकांत नाकाडे, सरपंच पंचशीला मेश्राम, संजय ईश्वार, मधुकर ठाकरे, प्रभाकर कोवे उपस्थित होते.