
अमरावती : काँग्रेसच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील आमदार सुलभा खोडके यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलेल्या सुचनेनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्यानंतरही आपण सतत पक्षविरोधी काम केल्याच्या अनेक तक्रारी प्रदेश कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून आपणास काँग्रेस पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे, असे नाना पटोले यांनी आमदार सुलभा खोडके यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ केल्याची चर्चा होती. या आमदारांमध्ये सुलभा खोडके यांचेही नाव समोर आले होते, पण सुलभा खोडके यांनी हा आरोप फेटाळून लावला होता.दरम्यान, सुलभा खोडके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली होती. रमेश चेन्नीथला हे अमरावतीच्या भेटीवर असताना आयोजित कार्यक्रमांमध्ये आमदार म्हणून आपल्याला सन्मान देण्यात आला नाही. स्थानिक नेत्यांनी आपला अनेकवेळा अपमान केला, असा आरोप सुलभा खोडके यांनी केला होता.