
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून अहेरी विधानसभेतून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अहेरीत आता पिता विरुद्ध पुत्री, अशी लढत होणार आहे. काही दिवसांपूर्वी भाग्यश्री यांनी वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात बंड करून शरद पवार गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून अहेरी विधानसभेतील राजकारणाची राज्यपातळीवर चर्चा होती. सोबतच काँग्रेसनेही या जागेवर आपला दावा कायम ठेवल्याने आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम शरद पवार गटाच्या संपर्कात होत्या. महिनाभरापूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. अहेरी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपारिक दावा राहिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस आग्रही असताना देखील शरद पवार गटाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ४५ उमेदवारांच्या यादीत भाग्यश्री आत्राम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अहेरीत ‘वडील विरुद्ध मुलगी’ असा थेट सामना होणार आहे.